IND vs AUS : अहमदाबाद टेस्ट मॅच कुठल्याही निकालाशिवाय संपली. पण या टेस्ट मॅचमध्ये असं काही घडलं की, ज्याची क्रिकेटप्रेमी बऱ्याच काळापासून प्रतिक्षा करत होते. विराट कोहलीच शतक हे या टेस्ट मॅचच वैशिष्ट्य ठरलं. भारतीय टीमचा माजी कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध अहमदाबाद टेस्ट मॅचमध्ये 186 धावांची इनिंग खेळला. साडेतीन वर्षानंतर टेस्ट क्रिकेटमधील विराटची ही पहिली सेंच्युरी आहे. या शतकाने सर्वचजण खूश झाले. टीम इंडियातील कोहलीच्या सहकाऱ्यांना विशेष आनंद झाला.
कोहलीने मोठी इनिंग खेळावी, अशी प्रत्येकाची इच्छा होती. कोहली मोठी इनिंग खेळण्यात जेव्हा अपयशी ठरला, तेव्हा अश्विनने त्याच्यासोबत चर्चा करुन त्याला दिलासा दिला.
अश्विनने वाढवला उत्साह
भारताकडून ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या सीरीजमध्ये विराट कोहलीने सर्वाधिक 297 धावा केल्या. यात 186 धावा त्याने सीरीजमधील शेवटच्या कसोटी सामन्यात केल्या. त्याआधी तीन कसोटी सामन्यात मिळून त्याने फक्त 111 धावा केल्या होत्या. दिल्लीमधील 44 सर्वाधिक धावा होत्या. इंदोर टेस्टमध्ये अन्य फलंदाजांप्रमाणे कोहली सुद्धा अपयशी ठरला. त्यावेळी अश्विनने कोहली बरोबर चर्चा केली. ‘तू चांगली बॅटिंग करतोयस, फक्त मोठ्या स्कोरची प्रतिक्षा आहे’ या शब्दांनी त्याने धीर दिला.
अश्विनने काय सांगितलं?
चौथ्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी अश्विनने स्टार स्पोर्ट्सवर बोलताना या गोष्टीचा उलगडा केला. इंदोर टेस्ट मॅचमध्ये पराभव झाल्यानंतर विराट कोहलीशी चर्चा केल्याच अश्विनने सांगितलं.
“इंदोर कसोटीनंतर मी आणि विराटने चर्चा केली. आम्ही नेहमीच या विषयांवर सतत बोलत नाही. विराट खरोखर चांगली बॅटिंग करतोय, असं मला मनापासून वाटत होतं. तो विकेटवर जास्त वेळ घालवायचा. चांगली सुरुवात मिळाल्यानंतर 30-40 रन्सवर आऊट व्हायचा”
माझ्या करिअरमध्येही अशाच गोष्टी बदलल्या आहेत
कोहलीला साथ देणं हाच यामागे उद्देश असल्याच अश्विनने सांगितलं. “तू चांगली बॅटिंग करतोयस, हे त्या व्यक्तीला खांद्यावर हात ठेवून सांगायच होतं. फक्त टिकून राहण्याची गरज होती. माझ्या क्रिकेट करिअरमध्येही अशाच गोष्टी बदलल्या आहेत. कोहली मोठी इनिंग लवकरच खेळेल असं मला वाटत होतं” असं अश्विन म्हणाला.