Rohit Sharma : रोहित शर्माकडे शेवटची संधी; नाहीतर कर्णधारपद गमवावं लागणार?
विराट कोहली कर्णधारपदावरुन पायउतार झाल्यानंतर रोहित शर्माला जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र आता रोहितवर कर्णधारपद गमावण्याची टांगती तलवार आहे.
नागपूर : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलिया पॅट कमिन्सच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. तर रोहित शर्मा याच्याकडे टीम इंडियाच्या कॅप्टन्सीची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र या मालिकेच्या आधी रोहितसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या कसोटी मालिकेत रोहितची अग्निपरीक्षा असणार आहे. कारण, या मालिकेत भारताचा पराभव झाला, तर रोहितचं कर्णधारपद जाऊ शकतं.
टीम इंडिया 2011 पासून वर्ल्ड कपच्या प्रतिक्षेत आहे. टीम इंडियाची आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची प्रतिक्षा ही 13 वर्षांपासून कायम आहे. टीम इंडियाला 2021 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन होण्याची संधी होती. मात्र न्यूझीलंडने पराभूत केल्याने भारताचं आयसीसी चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंगलं.
विराटने टी 20 वर्ल्ड कपनंतर कर्णधारपद सोडलं. त्यानंतर रोहितने सर्व सूत्रं हाती घेतली. तेव्हापासून ते आतापर्यंत टीम इंडियाने रोहितच्या नेतृत्वात आशिया कप 2022 आणि टी 20 वर्ल्ड कप 2022 गमावला आहे.
कसोटी मालिका म्हणजेच कर्णधारपद?
आता टीम इंडिया घरच्या मैदानात ऑस्ट्रेलिया विरुद्ध 4 सामन्यांची मालिका खेळणार आहे. टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी ही मालिका 3-1 किंवा 2-0 अशा फरकाने जिंकावी लागणार आहे. तरच टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध अंतिम सामन्यात प्रवेश मिळेल.
बीसीसीआय अधिकारी काय म्हणाला?
“आम्ही आणखी एका आयसीसी ट्रॉफी गमावण्याची जोखीम घेऊ शकत नाही. आम्ही वर्ल्ड कप जिंकू शकलो नाही, तर इतर विक्रमांना काहीच अर्थ राहणार नाही. आपण 2 वर्षांमध्ये 3 स्पर्धेत पराभूत झालो आहोत. हे रोहितला आणि संपूर्ण टीमला माहिती आहे. वर्ल्ड कपची प्रतिक्षा संपवण्याचा प्रत्येकाचा संकल्प आहे”, असं या वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाईड स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.