WTC Final 2023 रोहित शर्मा याची कॅप्टन्सी जाणार? बीसीसीआय अधिकाऱ्याने काय म्हटलं?
रोहित शर्मा सध्या टीम इंडियाचं एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये नेतृत्व करतो. सध्या टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलची तयारी करतेय, या दरम्यान मोठी बातमी समोर आली आहे.
लंडन | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल महामुकाबल्यासाठी आता तयारी शेवटच्या टप्प्यात आहे. या कसोटी वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया असे दोन्ही संघ सज्ज आहेत. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर पॅट कमिन्स याच्याकडे कांगारुंची धुरा आहे. दोन्ही संघांनी या महाअंतिम सामन्यासाठी कसून सराव केला आहे. या महत्वाच्या सामन्याला आता 100 तासांपेक्षा कमी वेळ शिल्लक राहिला आहे. मात्र याआधी रोहित शर्माच्या कॅप्टन्सीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबत महत्वाची माहिती दिली आहे.
टीम इंडियाला 2011 पासून एकदाही वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या निमित्ताने टीम इंडियाकडे ती संधी आहे. रोहित शर्मा याच्यावर कॅप्टन म्हणून टीम इंडियाला विजय मिळवून देण्याचा दबाव असणार आहे. रोहितने आतापर्यंत एकूण 6 कसोटी सामन्यांमध्येच भारताचं नेतृत्व केलं आहे. रोहितने दोन्ही मालिकांमध्ये भारताला विजयी केलं आहे. मात्र या दरम्यान रोहितच्या वैयक्तिक कामगिरीत घसरण झाली आहे. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपनंतर कॅप्टन बदलणार की काय, अशी भीती क्रिकेट चाहत्यांना सतावतेय.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलनंतर काही महिन्यांनी एकदिवसीय वनडे वर्ल्ड कपचं आयोजन भारतात करण्यात येणार आहे. तोपर्यंत कर्णधार म्हणून कोणताही बदल होणार नाही. मात्र रोहितच्या विरोधात एक गोष्ट जाऊ शकते ती म्हणजे त्याचं वय.
रोहितचं वय 36 वर्ष इतकं आहे. येत्या काही दिवसांमध्ये रोहितला कर्णधारपदी राहणं हे वयामुळे आव्हानात्मक ठरु शकतं. या दरम्यान बीसीसीआय वरिष्ठ अधिकाऱ्याने मोठी अपडेट दिली आहे. रोहित केव्हापर्यंत टेस्ट क्रिकेट खेळेल याबाबत काही निश्चितती नाही, असं बीसीसीआय अधिकाऱ्याने म्हटलंय.
बीसीसीआय अधिकारी काय म्हणाले?
बीसीसीआय अधिकाऱ्याने इनसाईड स्पोर्ट्सला दिलेल्या माहितीनुसार, “सध्या कसोटी कर्णधार शोधण्याची घाई नाही. रोहित फिट आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलचा निकाल काहीही येवो, कॅप्टन म्हणून रोहितच राहिल. मात्र रोहितला कुठवर टेस्ट क्रिकेट खेळायचंय हे नक्की नाही. याबाबत आमची काही चर्चा झालेली नाही. मात्र वनडे वर्ल्ड कपनंतर आम्ही रोहितसोबत चर्चा करु.” त्यामुळे आता काय चर्चा होते याकडे रोहित चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
WTC Final साठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार
WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया
पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.
राखीव खेळाडू | मिचल मार्श आणि मॅथ्यू रेनशॉ