IND vs BAN : विराटचं शतक रोखण्यासाठी वाइड बॉल टाकला? बांगलादेश कर्णधाराने खरं काय ते सांगून टाकलं
World Cup 2023, IND vs BAN : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत बांगलादेश विरुद्धचा सामना भारताने 7 गडी राखून जिंकला. विराट कोहली याने षटकार ठोकत विजयासह शतक साजरं केलं. पण या शतकापूर्वी बराच ड्रामा पाहायला मिळाला. त्याबाबत आता बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसैन शांतो याने सांगितलं आहे.
मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताने बांगलादेशवर 7 गडी राखून विजय मिळवला. स्पर्धेतील हा भारताचा सलग चौथा विजय आहे. पण या विजयापेक्षा विराट कोहलीचं शतक आणि वाइड बॉल यावरून चर्चा रंगली. विराट कोहलीला शतकासाठी 3 धावा आणि संघाला विजयासाठी 2 धावांची गरज असताना बांगलादेशी फिरकीपटू नासुम अहमद याने वाइड चेंडू टाकला. नासुम याने जाणीवपूर्वक वाइड चेंडू टाकला असं बोललं जात आहे. पण पंचांनी हा चेंडू वाइड दिला नाही. दुसरीकडे, नासुमने हा चेंडू विराटचं शतक हुकावं यासाठी वाइड टाकला होता अशी चर्चा रंगली आहे. यावर बांगलादेशचा कार्यवाहक कर्णधार नजमुल हुसैन शांतो याने स्पष्टीकरण दिलं आहे.
काय म्हणाला नजमुल हुसैन शांतो?
आमचा असा कोणताच हेतू नव्हता. कोणताही गोलंदाज जाणीवपूर्वक वाइड चेंडू टाकत नाही, असं स्पष्टीकरण नजमुल हुसैन शांतो यांनी दिलं आहे. “नाही..नाही..नाही..हे काय ठरवून केलं नव्हतं.. आम्ही योग्य पद्धतीनेच खेळत होतो. त्यामुळे यामागे काहीच हेतू नव्हतो.”, असं कार्यवाहक कर्णधार नजमुल हुसैन शांतो म्हणाला.
वाइड बॉल नियम काय सांगतो?
एमसीसी नियम 22.4 नुसार वाइड बॉलबाबत सांगितलं गेलं आहे. यात मार्च 2022 मध्ये बदल करण्यात आला आहे. जर फलंदाज गोलंदाजी दरम्यान मूव करत असेल तर वाइड बॉल दिला जाणार नाही. वाइड चेंडूसाठी फलंदाजाची पोजिशन बघितली जाते. विराट तो शॉट खेळताना मूव झाला होता. त्यामुळे पंचांनी वाइड बॉल दिला नाही. त्यामुळे पंचांच्या दृष्टीने तो चेंडू वाइड नसल्याचं सिद्ध होतं. दुसरीकडे, दुसऱ्याच चेंडूवर विराट कोहलीने षटकार ठोकला आणि बोलती बंद केली होती. कारण तो वाइ़ड जरी दिला असता तरी एक धाव हवीच असती आणि षटकार मारून शतक आरामात पूर्ण झालंच असतं, हे देखील तितकंच खरं आहे.
विराट कोहली याने षटकार मारला आणि 48 वं षटक ठोकलं
विराट कोहील याने वनडे क्रिकेटमधील 48 वं शतक ठोकलं आहे. विराट कोहलीचं तिन्ही फॉर्मेटमधलं हे 77 वं शतक आहे. क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे. त्याने शतकांचं शतक ठोकलं आहे. विराट कोहली दुसऱ्या स्थानावर असून 77, रिकी पॉटिंग 71 शतकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.