भारताविरूद्धच्या कसोटी सामन्यासाठी बांगलादेशचा संघ जाहीर, पाकिस्तान टूरमधील या खेळाडूला आराम
भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी भारताने संघ जाहीर केला आहे. आता बांगलादेशने कसोटीसाठी संघ जाहीर करत आव्हान दिलं आहे. पाकिस्तान दौऱ्यातील संघात काही बदल करण्यात आला आहे.
भारत आणि बांग्लादेश यांच्यात 19 सप्टेंबरपासून कसोटी मालिका सुरु होणार आहे. मालिकेसाठी बांगलादेशने 16 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या संघाचं नेतृत्व नजमुल शांतो यांच्या हाती आहे. त्याच्याच नेतृत्वात बांगलादेशने पाकिस्तानमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला होता. पण भारत दौऱ्यासाठी बांग्लादेश संघात एक बदल करण्यात आला आहे. जाकर अलीने दुखापतग्रस्त असलेल्या शरीफुल इस्लामची जागा घेतली आहे. हा एकमेव बदल बांग्लादेश संघात करण्यात आला आहे. दुसरीकडे, शाकीब अल हसनला संघात स्थान मिळालं आहे. पाकिस्तान दौऱ्यावर असताना त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तो थेट इंग्लंडला गेला होता. त्यामुळे तो संघात असेल की नाही याबाबत शंका होती. पण त्याची संघात निवड केली गेली आहे. पाकिस्तानला त्यांच्याच भूमीत 2-0 ने पराभूत केल्यानंतर बांगलादेशचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. त्यामुळे भारतासमोर तगडं आव्हान असणार आहे. खरं पाहिलं तर ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 दृष्टीने खूपच महत्त्वाची आहे. खासकरून भारतासाठी ही मालिका पुढचं गणित ठरवणार आहे. कारण भारताला गुणतालिकेत अव्वल स्थान टिकवायचं असेल तर मालिका 2-0 ने जिंकावी लागेल.
भारताच्या कसोटी मालिकेसाठी बांगलादेश संघ: नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन कुमेर दास, मेहिदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, नईम हसन, नाहिद राणा , जाकेर अली, हसन महमूद, तस्किन अहमद, सय्यद खालेद अहमद.
Bangladesh Test Squad for the India Tour 2024#BCB #Cricket #BDCricket #Bangladesh #INDvsBAN pic.twitter.com/1npeXGgkix
— Bangladesh Cricket (@BCBtigers) September 12, 2024
पहिल्या बांगलादेश कसोटीसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल , सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव, मोहम्मद सिराज , आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.
दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात काही बदल होणं तसं कठीण आहे. पण पहिल्या कसोटी सामन्यातील कामगिरीवर दुसऱ्या कसोटी संघाचं ठरेल असं दिसत आहे. आजपासून भारतीय संघ गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली चेन्नईच्या चेपॉक मैदानात सराव करत आहे.