IND vs BAN: मुंबईकर यशस्वी जयस्वालकडून सुनील गावस्करांचा रेकॉर्ड ब्रेक, ब्रॅडमॅन यांच्या यादीत स्थान
Yashasvi Jaiswal Record: यशस्वी जयस्वालने पहिल्या डावात अर्धशतकी खेळी करत टीम इंडियाचा डाव सावरला. मात्र यशस्वी दुसऱ्या डावात 10 धावांवर बाद झाला. मात्र त्यानंतरही यशस्वीने मोठा कारनामा केला आहे.
चेन्नई कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी बांगलादेशला टीम इंडियाने 149 ऑलआऊट केलं. त्यानंतर टीम इंडियाची दुसऱ्या डावात वाईट सुरुवात झाली. टीम इंडियाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 3 विकेट्स गमावून 81 धावा केल्या. पहिल्या डावातील 227 धावांच्या आघाडीच्या जोरावर टीम इंडिया भक्कम स्थितीत पोहचली आहे. त्यामुळे टीम इंडियाकडे 308 धावांची आघाडी आहे. ऋषभ पंत 12 आणि शुबमन गिल 33 धावांवर नाबाद आहेत. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा 5 धावा करुन आऊट झाला. विराट कोहलीनेही दुसऱ्या डावात निराशा केली. विराटने 17 धावांचं योगदान दिलं. तर पहिल्या डावात अर्धशतक करणाऱ्या यशस्वीला या डावात काही खास करता आलं नाही. यशस्वीने 10 धावा केल्या. मात्र यशस्वीने यासह खास कारनामा करत मानाच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे. यशस्वीने दिग्गज डॉन ब्रॅडमॅन, एवर्टन वीक्स, जॉर्ज हाडली या सारख्या महान खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवलं आहे.
यशस्वी कसोटी कारकीर्दीतील 10 सामन्यांनंतर सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानी पोहचला आहे. यशस्वीच्या 10 सामन्यांनंतर 1 हजार 94 धावा झाल्या आहेत. या यादीत डॉन ब्रॅडमॅन 1 हजार 446 धावांसह पहिल्या स्थानी आहेत. तर विंडिजचे माजी खेळाडू एवर्टन वीक्स दुसऱ्या आणि जॉर्ज हेडली तिसऱ्या स्थानी विराजमान आहेत. त्यानंतर आपल्या यशस्वीचा क्रमांक लागतो. यशस्वी या कामगिरीसह पहिल्या 10 कसोटींमध्ये सर्वाधिक धावा करणारा पहिला भारतीय ठरला आहे. यशस्वीने ‘लिटील मास्टर’ सुनील गावस्कर यांचा विक्रम मोडीत काढला आहे. गावस्कर यांनी 10 कसोटींनंतर 978 धावा केल्या होत्या.
पहिल्या 10 कसोटींनंतर सर्वाधिक धावा
मार्क टेलर – 1 हजार 88 यशस्वी जयस्वाल – 1 हजार 94 जॉर्ज हेडली – 1 हजार 102 डॉन ब्रॅडमॅन – 1 हजार 446 धावा एवर्टन वीक्स – 1 हजार 125 धावा
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद आणि नाहिद राणा.