IND vs ENG : तिसरा कसोटी सामना जिंकताच रोहित शर्माच्या मनातलं ओठावर आलं, विजयाचं श्रेय या खेळाडूला देत सांगून टाकलं सर्व काही
पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने २-१ ने आघाडी घेतली आहे. तिसरा कसोटी सामना भारताने ४३४ धावांनी जिंकला. दुसऱ्या दिवशी बेझबॉल रणनितीने थोडं टेन्शन वाटलं होतं. पण तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी इंग्लंडला बॅकफूटला ढकललं. आता चौथा सामना जिंकताच टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये अव्वल स्थान गाठेल.
मुंबई : भारताने इंग्लंड विरुद्धचा तिसरा कसोटी सामना ४३४ धावांनी जिंकला. तसेच मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. या सामन्यातील विजयामुळे इंग्लंडला उर्वरित दोन सामन्यात कमबॅक करण्यासाठी जोरदार कसरत करावी लागणार आहे. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने पहिल्या डावात सर्व गडी बाद ४४५ धावा केल्या. त्याचं प्रत्युत्तर देताना इंग्लंडने आक्रमक फलंदाजी केली. दुसऱ्या दिवसखेर बेझबॉल रणनितीने भारतीय गोलंदाजांना घाम फुटला होता. पण तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने जोरदार कमबॅक केलं. ३१९ धावांवर संपूर्ण संघाला तंबूत पाठवलं आणि १२६ धावांची आघाडी घेतली. तसेच दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वालने नाबाद २१४ धावांची खेळी केली. यामुळे टीम इंडियाला मोठी आघाडी घेण्यात यश आलं. चौथ्या दिवशी टीम इंडियाने ४ गडी गमवून ४३० धावा केल्या आणि विजयासाठी ५५६ धावांचं आव्हान दिलं. पण इंग्लंडचा संपूर्ण संघ अवघ्या १२२ धावांवर तंबूत परतला. टीम इंडियाने ४३४ धावांनी विजय मिळवला. या विजयाचं श्रेय कर्णधार रोहित शर्मा याने या खेळाडूला दिलं.
दुसऱ्या दिवशी इंग्लंडची आक्रमक खेळी पाहून मनात काय सुरु होतं? या प्रश्नावर रोहित शर्माने सांगितलं की, ‘त्यांनी दुसऱ्या दिवशी आक्रमक खेळी करून दबाव आणला होता. पण मी गोलंदाजांना शांतपणे सामना करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर तिसऱ्या दिवशी आम्ही कमबॅक केलं याचा आनंद आहे. जडेजाला पाचव्या क्रमांकार फलंदाजीसाठी पाठवण्यामागेही हेतू होता. त्याच्याकडे चांगला अनुभव आहे. डावं उजवं कॉम्बिनेशन हवं होतं. तर सरफराज खाननेही चांगली खेळी केली.’, असं कर्णधार रोहित शर्मा म्हणाला.
“भारतात नाणेफेक जिंकणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. कारण बरंंच काही ठरतं. पण सामन्यात पुनरागमन करण्यात गोलंदाजांचा मोठा हात आहे. हे विसरून चालणार नाही. आमचा अनुभवी गोलंदाज मध्यात नव्हता. त्यामुळे जडेजाने चांगली गोलंदाजी केली. बॅटनेही त्याने कमाल केली होती. “, असं सांगत रोहित शर्माने रवींद्र जडेजाचं कौतुक केलं. तर यशस्वी जयस्वाल हा उत्तम खेळाडू त्याच्याबद्दल जास्त काही बोलायची आवश्यकता नाही. त्याने चांगली कामगिरी करत राहावी, असं रोहित शर्मा पुढे म्हणाला.
कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा हा सर्वात मोठा विजय राहिला आहे. इंग्लंडचा ४३४ धावांनी पराभूत केलं आहे. यापूर्वी २०२१ मध्ये न्यूझीलंडला ३७२ धावांनी पराभूत केलं होतं. तर दक्षिण अफ्रिकेला २०१५ मध्ये ३३७ धावांनी पराभूत केलं आहे.