IND vs ENG 1st ODI: बुम बुम बुमराहचा धमाका, इंग्लंडची टीम 110 रन्सवर All out, इंग्लिश फलंदाजांच्या काठ्या वाजवल्या VIDEO

| Updated on: Jul 12, 2022 | 7:47 PM

IND vs ENG 1st ODI: जसप्रीत बुमराह (Jasprit bumrah) भारताचा प्रमुख आधारस्तंभ का आहे? तो प्रतिस्पर्धी संघासाठी सर्वात धोकादायक गोलंदाज का आहे? ते आज पुन्हा एकदा सिद्ध झालं.

IND vs ENG 1st ODI: बुम बुम बुमराहचा धमाका, इंग्लंडची टीम 110 रन्सवर All out,  इंग्लिश फलंदाजांच्या काठ्या वाजवल्या VIDEO
ind vs eng
Image Credit source: AFP
Follow us on

मुंबई: जसप्रीत बुमराह (Jasprit bumrah) भारताचा प्रमुख आधारस्तंभ का आहे? तो प्रतिस्पर्धी संघासाठी सर्वात धोकादायक गोलंदाज का आहे? ते आज पुन्हा एकदा सिद्ध झालं. जसप्रीत बुमराहच्या भन्नाट गोलंदाजीसमोर आज इंग्लंडच्या (IND vs ENG) फलंदाजांनी अक्षरक्ष: गुडघे टेकले. त्याची गोलंदाजी खेळणं आज इंग्लंडच्या फलंदाजांना जमलच नाही. संघाच्या दुसऱ्या आणि व्यक्तीगत पहिल्या षटकापासून त्याने इंग्लंडला हादरवून सोडलं. ज्यो रुट, (Joe Root) जॉनी बेयरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, बेन स्टोक्स हे फक्त कागदी वाघ असल्याचं आज दिसलं. पहिल्या वनडे मध्ये इंग्लंडची टीम 110 धावांवर आऊट झाली. जसप्रीत बुमराहने इंग्लंडच्या सहा विकेट काढल्या. नवव्या विकेटसाठी विली आणि कार्स मध्ये 35 धावांची भागीदारी झाली. त्यामुळे इंग्लंडच्या संघाला शंभरी पार करता आली. एजबॅस्टन कसोटीत इंग्लंडला विजय मिळवून देणारे जॉनी बेयरस्टो आणि ज्यो रुट आज फेल ठरले. एकाबाजूने जसप्रीत बुमराह, दुसऱ्याबाजूने मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णाने इंग्लंडची वाट लावली.

बुमराह-शमी जोडीने कर्णधाराचा हा निर्णय सार्थ ठरवला

15 षटकाअखेरीस इंग्लंडची स्थिती 59/7 होती. बुमराह 7.2 ओव्हर्स 3 निर्धाव 19 धावा आणि 6 विकेट असं त्याच्या गोलंदाजीच पृथ्थकरण आहे. मोहम्मद शमीने 3 आणि प्रसिद्ध कृष्णाने एक विकेट काढली. भारताचा कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बुमराह-शमी जोडीने कर्णधाराचा हा निर्णय सार्थ ठरवला. जसप्रीत बुमराहने आपल्या पहिल्याच ओव्हर मध्ये इंग्लंडला दोन धक्के दिले. जेसन रॉयला भोपळाही फोडू न देता माघारी परतवले. तीच गत ज्यो रुटची केली. ज्यो रुटला खातही उघडू दिलं नाही, ऋषभ पंतकरवी त्याला झेलबाद केलं. इंग्लंडची दोन बाद 6 अशी स्थिती होती.

मोहम्मद शमीने धक्का दिला

त्यानंतर पुढच्याच तिसऱ्या षटकात मोहम्मद शमीने धक्का दिला. त्याने बेन स्टोक्सला शुन्यावरच ऋषभ पंतकरवी झेलबाद केलं. सहाव्या षटकात बुमराहने जॉनी बेयरस्टोला 7 धावांवर माघारी धाडलं. ऋषभ पंतकडे झेल द्यायला लावला. लियाम लिव्हिंगस्टोनला शुन्यावरच बुमराहने क्लीन बोल्ड केलं.

भारतीय गोलंदाजांनी पुरेपूर फायदा उचलला

जोस बटलरने थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण मोहम्मद शमीने त्याला सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद केलं. बटलरने 30 धावा केल्या. प्रसिद्ध कृ्ष्णाने आपल्याच गोलंदाजीवर मोइन अलीचा 14 धावांवर झेल घेतला. जेसन रॉय, जॉनी बेयरस्टो, ज्यो रुट या पहिल्या तीन फलंदाजांना बुमराहनेच बाद केलं. ओव्हलची खेळपट्टी सुरुवातीच्या षटकात गोलंदाजांना अनुकूल वाटत होती. या पीच वर चेंडूला उसळी मिळत होती. त्याचा भारतीय गोलंदाजांनी पुरेपूर फायदा उचलला.