मुंबई : इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणम येथे सुरु झाला आहे. नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला असून कर्णधार रोहित शर्मा याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. खेळपट्टी फलंदाजीसाठी पूरक असल्याने रोहित शर्माने हा निर्णय घेतला आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडकडे 1-0 ने आघाडी आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात कमबॅकचं मोठं आव्हान टीम इंडियापुढे आहे. नाणेफेकीचा कौल रोहित शर्माने जिंकल्यानंतर लगेच फलंदाजी स्वीकारली तसेच मागच्या कसोटी सामन्याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. “आम्ही पहिल्यांदा फलंदाजी करू. खेळपट्टी त्याचं काम करेल. पण आम्हाला चांगलं क्रिकेट खेळायचं आहे. हैदराबादमध्ये जे काही झालं तो आता भूतकाळ आहे. आता आम्हाला पुढे जाण्याची गरज आहे. आता आपल्या पुढे काय करायचं आहे यावर लक्ष केंद्रीत करणं गरजेचं आहे. आम्ही पहिल्या डावात चांगली फलंदाजी केली पण दुसऱ्या डावात तसं झालं नाही. दुसऱ्या डावात ओली पोपने चांगली गोलंदाजी केली.” असं रोहित शर्माने सांगितलं.
टीम इंडियात केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांच्या जागी दोन खेळाडूंना संधी मिळाली. तर मोहम्मद सिराज याला आराम देण्यात आला आहे. संघात मुकेश कुमार, कुलदीप यादव आणि रजत पाटीदार याला संधी देण्यात आली आहे. यावर कर्णधार रोहित शर्मा याने सांगितलं की, “खेळामध्ये दुखापती या होत असतात. त्यामुळेच राखीव खेळाडू असतात. जडेजा आणि केएल नाहीत, तर सिराजला आराम देण्यात आला आहे. त्यांच्याऐवजी संघात मुकेश, कुलदीप आणि रजत पाटीदार यांना संधी देण्यात आली आहे.”
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, श्रीकर भारत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मुकेश कुमार, कुलदीप यादव
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर, जेम्स अँडरसन