बूमssss! जसप्रीत बुमराहचा भेदक मारा, ओली पोपच्या अशा उडवल्या दांड्या Watch Video
भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारताने 396 धावांची खेळी केली. यशस्वी जयस्वालच्या 209 धावांच्या जोरावर ही धावसंख्या गाठणं सोपं झालं. तर भारतीय गोलंदाजांचा जलवाही दिसून आला. पहिल्या सामन्यात भारताच्या पराभवाची स्क्रिप्ट लिहिणाऱ्या ओली पोपला जसप्रीत बुमराहने तंबूत धाडला.
मुंबई : भारत इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणम येथे सुरु आहे. पाच सामन्यातील पहिला सामना जिंकून इंग्लंडने आघाडी घेतली आहे. त्यामुळे सामन्यात कमबॅक करण्याचं मोठं आव्हान आहे. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय कर्णधार रोहित शर्माने घेतला. एकीकडे धडाधड विकेट पडत असताना यशस्वी जयस्वालने मोठी खेळी केली. 209 धावा करत टीम इंडियाला सन्मानजनक धावसंख्या उभारून देण्यास मदत केली. भारताने पहिल्या डावात सर्वबाद 396 धावा केल्या आहेत. आता भारतीय गोलंदाजांसमोर ही धावसंख्या रोखण्याचं आव्हान आहे. पहिल्या सामन्यात ओली पोपने भारतीय गोलंदाजांची पिसं काढली होती. त्याचा हिशेब दुसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहने केला. झॅक क्राउले आणि बेन डुकेट यांनी इंग्लंडला चांगली सुरुवात करून दिली. कुलदीप यादवने ही जोडी फोडली. त्यानंतर अक्षर पटेलने झॅक क्राउलेला तंबूत पाठवलं. जसप्रीत बुमराहने मग आपली अस्त्र वापरण्यास सुरुवात केली.
जो रूटला 5 धावांवर असताना बाद केलं. त्यानंतर ओली पोपचा मोठा अडसर होता. त्यावर जसप्रीत बुमराहने आपलं भेदक असं यॉर्कर अस्त्र काढलं. पोपला काही कळायच्या आतच त्याचा त्रिफळा उडवला. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवूनही काही उपयोग झाला नाही. चेंडूच्या दिशेने ओली पोपची हालचाल झाली खरी पण चेंडू बुंद्यात बसला आणि त्रिफळा उडाला. काहीच पर्याय नसल्यासारखं त्याला फक्त जमिनीकडे पाहात राहावं लागलं. अवघ्या 23 धावांवर ओली पोपची इनिंग संपली. ही विकेट पाहून तुम्हीही जसप्रीतच्या गोलंदाजीचं कौतुक कराल.
Timber Striker Alert 🚨
A Jasprit Bumrah special 🎯 🔥
Drop an emoji in the comments below 🔽 to describe that dismissal
Follow the match ▶️ https://t.co/X85JZGt0EV#TeamIndia | #INDvENG | @Jaspritbumrah93 | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/U9mpYkYp6v
— BCCI (@BCCI) February 3, 2024
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
दुसऱ्या कसोटीसाठी भारताची प्लेइंग 11: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह.
दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग 11: जॅक क्राउली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर, जेम्स अँडरसन.