तिसऱ्या टी20 सामन्यात इंग्लंडचं कमबॅक, भारताचा मालिका विजय लांबला
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा सामना राजकोट येथे पार पडला. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय इंग्लंडच्या पथ्यावर पडला. कारण इंग्लंडने दिलेलं आव्हान काही भारताला गाठता आलं नाही.
पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत इंग्लंडने जबरदस्त कमबॅक केलं आहे. मालिका गमवण्याच्या स्थितीत असलेल्या तिसऱ्या सामन्यात चांगली कामगिरी केली. खरं तर नाणेफेकीचा कौल काही इंग्लंडच्या बाजूने लागला नव्हता. त्यामुळे हा सामनाही इंग्लंडला गमवावा लागतो की काय असं वाटत होतं. इंग्लंडने तिसऱ्या टी20 सामन्यात 9 गडी गमवून 171 धावा केल्या आणि विजयासाठी 172 धावांचं आव्हान दिलं. भारताने 20 षटकात 9 गडी गमवून 145 धावा केल्या आणि 26 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं. हे आव्हान गाठताना भारताचे आघाडीचे फलंदाज फेल गेले. संजू सॅमसनला शॉर्ट बॉल रणनितीनुसार स्वस्तात बाद केलं.अभिषेक शर्माने आक्रमक फलंदाजी करत 14 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 24 धावा केल्या. मात्र यात आणखी भर घालण्यात अपयश आलं. कार्सने त्याला आपल्या जाळ्यात ओढलं आणि तंबूत पाठवलं. दुसरीकडे, सूर्यकुमार यादवला स्लोअर आर्म गोलंदाजी करत बरोबर जाळ्यात ओढलं. मार्क वूडने त्याला बरोबर टप्प्यात चेंडू टाकला आणि तसाच उंच बॉल मारत सूर्यकुमार यादव बाद झाला. तिलक वर्माकडून या सामन्यात अपेक्षा होत्या. मात्र त्याचीही जादू चालली नाही. तोही सपशेल फेल गेला. त्यामुळे मधल्या फळीवर धावा करण्याची जबाबदारी आली. हार्दिक पांड्या आणि वॉशिंग्टन सुंदरकडून अपेक्षा होत्या. मात्र वॉशिंग्टन सुंदर फक्त 6 धावा करून बाद झाला.
वरुण चक्रवर्तीने या सामन्यात पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीने प्रभावित केलं. त्याने पाच विकेट घेत इंग्लंडला बॅकफूटला ढकललं. पण खूप दिवसांनी या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मोहम्मद शमीची झोळी रिकामी राहिली. त्याने 3 षटकात 25 धावा दिल्या आणि एकही विकेट मिळाली नाही.
इंग्लंडने पाच सामन्याच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना जिंकत मालिकेतील अस्तित्व अजूनही कायम ठेवलं आहे. मालिकेत 2-1 अशी स्थिती आहे. भारताला मालिका खिशात घालण्यासाठी दोन पैकी एक सामना जिंकावा लागणार आहे. तर इंग्लंडला या दोन्ही सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे.
दोन्ही संघाची प्लेइंग 11
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, बेन डकेट, जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी स्मिथ (विकेटकीपर), जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड.
भारत (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), ध्रुव जुरेल, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती