IND vs ENG : इंग्लंडच्या बेझबॉल रणनितीवर आर अश्विनने सरळ व्यक्त केलं मत, असंच राहीलं तर…
पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा खूपच महत्त्वाचा आहे. पहिल्या दोन सामन्यात 1-1 ने बरोबरी आहे. त्यामुळे मालिकेत आघाडीसोबत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने विजय खूपच महत्त्वाचा आहे. पहिल्या डावात टीम इंडियाने 445 धावा केल्या. पण इंग्लंच्या बेझबॉल रणनितीने भारतीय गोलंदाजांची पिसं निघाली.
मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसरा दिवसाचा खेळ संपला. भारताने दुसऱ्या दिवसापर्यंत सर्वाबद 445 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी इंग्लंडचा संघ मैदानात उतरला आणि बेझबॉल रणनिती सुरु ठेवली. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना नेमका कुठे टप्पा टाकायचं याचाच विसर पडल्याचं दिसत होतं. अर्ध्या दिवसातच इंग्लंडने 2 गडी बाद 207 धावा केल्या. त्यामुळे भारताने समोर ठेवलेल्या धावांची बरोबरी साधण्यासाठी 238 धावांची गरज आहे. तसेच आक्रमक खेळी करणारा बेन डकेट मैदानात असून त्याला जो रूटची साथ आहे. त्यामुळे तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांना विकेट मिळाली नाही तर पुढचं गणित कठीण होईल असंच दिसत आहे. या सामन्यात जॅक क्राउलेला बाद करत आर अश्विनने आपल्या कसोटी कारकिर्दितील 500 विकेट पूर्ण केले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा त्याने आतापर्यंत कारकिर्दिवर भाष्य केलं. तसेच इंग्लंडची रणनिती पाहून एक भाकीतही वर्तवलं आहे.
आर अश्विनने व्यक्त केलं मत
“इंग्लंड ज्या प्रकारे खेळत आहे त्यावरून असं दिसतंय की जास्त षटके टाकण्याची गरज नाही. इंग्लंड आक्रमक क्रिकेट खेळत आहे. आम्हाला विचार करण्याची संधी मिळत नाही. पण पुढे या खेळपट्टीवर फलंदाजी करणे कठीण जाईल, असे मला वाटते. पाचव्या दिवशी खेळणं कठीण जाणार आहे. कसोटी तूल्यबळ असून कोणच्या बाजूने झुकेल सांगता येत नाही. आम्ही सकाळी परतण्याचा प्रयत्न करू. दबावातून बाहेर पडणं गरजेचं आहे.”, असं आर अश्विनने सांगितलं.
इंग्लंडचे दोन गडी बाद करण्यात टीम इंडियाला यश आलं आहे. अश्विन आणि सिराजने प्रत्येकी एक गडी बाद केला. त्यामुळे आता जसप्रीत बुमराहकडे आशा लागून आहेत. सकाळच्या सत्रात झटपट विकेट घेण्यास यश मिळालं तर टीम इंडिया कमबॅक करेल. अन्यथा हा सामना इंग्लंडच्या गोटातून खेचून आणणं कठीण आहे. दुसऱ्या डावात किमात भारताकडे 100 धावांची आघाडी असायला हवी. कारण विकेट जशी जुनी होईल, तसं फलंदाजी करणं कठीण जाणार हे मात्र खरं आहे. त्यामुळे दुसऱ्या डावात 250 ते 300 धावांचं आव्हान पुरेसं असेल.