Yashasvi Jaiswal | यशस्वी जयस्वाल याचा वर्ल्ड रेकॉर्ड, इंग्लंड विरुद्ध धुमशान
Yashasvi Jaiswal World Record | यशस्वी जयस्वाल याने इंग्लंड विरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात राजकोटमध्ये तुफानी द्विशतकी खेळी केली. यशस्वीच्या नावावर या खेळीसह वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत कुणालाच असं करणं जमलं नव्हतं.
राजकोट | टीम इंडियाच्या यशस्वी जयस्वाल याने इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात राजकोट येथे तिसऱ्या दिवशी सलग दुसरं द्विशतक ठोकलं. यशस्वीने इंग्लंडच्या गोलंदाजांना फोडून काढत वादळी खेळी केली. यशस्वीने दुसऱ्या डावात 236 बॉलमध्ये 214 धावांची नाबाद खेळी केली. यशस्वीच्या या खेळीत 14 चौकार आणि 12 षटकारांचा समावेश होता. यशस्वीने यासह एका डावात सर्वाधिक 12 षटकारांच्या विश्व विक्रमाची बरोबरी केली. पाकिस्तानच्या वसीम अक्रमने 1996 साली झिंबाब्वे विरुद्ध 12 सिक्स ठोकले होते.
यशस्वीमुळे 147 वर्षांनंतर पहिल्यांदाच घडलं
यशस्वीने इंग्लंड विरुद्धच्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत आतापर्यंत 3 सामन्यांमध्ये एकूण 22 सिक्स खेचले आहेत. कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात एका फलंदाजाने एकाच मालिकेत 20 पेक्षा अधिक सिक्स लगावण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. यशस्वीच्या या कामगिरीमुळे टीम इंडियाने एक मोठा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला आहे. टीम इंडिया यासह एका कसोटी मालिकेत सर्वाधिक 48 सिक्स लगावणारी टीम ठरली आहे. टीम इंडियाने यासह आपलाच रेकॉर्ड आणखी भक्कम केला आहे. याआधी टीम इंडियाने दक्षिण आफ्रिके विरुद्ध 2019 साली एका मालिकेत 47 सिक्स लगावले होते. टीम इंडियानंतर एका टेस्ट सीरिजमध्ये इंग्लंडने 43 आणि ऑस्ट्रेलियाने 40 सिक्स मारले आहेत.
एका सामन्यात सर्वाधिक सिक्स
टीम इंडियाने आपला आणखी एक विक्रम मोडीत काढला आहे. टीम इंडियाने राजकोट कसोटी सामन्यात एकूण 28 सिक्स ठोकले. तर याआधी टीम इंडियाने दक्षिण आफ्रिके विरुद्ध 2019 मध्ये 27 षटकार लगावले होते. दरम्यान इंग्लंडला तिसऱ्या कसोटीत 557 धावांचा पाठलाग करताना 122 धावाच करता आल्या. टीम इंडियाने अशाप्रकारे चौथ्याच दिवशी सामना 434 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. तसेच या विजयासह रोहितसेनेने 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.