IND vs ENG : विजयानंतर ध्रुव जुरेलने सांगितली मोठी गोष्ट, कसं शक्य झालं ते सर्वकाही
भारताने इंग्लंडविरुद्धची चौथा कसोटी सामना जिंकला आणि मालिका ३-१ ने खिशात घातली. चौथ्या सामना खऱ्या अर्थाने इंग्लंडचा बाजूने झुकला होता. पण ध्रुव तारा चमकला आणि सामना भारताच्या पारड्यात आला. या विजयानंतर ध्रुवला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. त्यानंतर त्याने बऱ्याच गोष्टी मनमोकळेपणाने सांगितल्या.
मुंबई : भारत इंग्लंड चौथा कसोटी सामना रंगतदार झाला. दुसऱ्या दिवसापर्यंत हा सामना इंग्लंडच्या बाजूने झुकलेला होता. इंग्लंडकडे ४६ धावांची आघाडी होती. पण ४६ धावांपर्यंत आघाडी कमी करण्यास महत्त्वाचं योगदान होतं ते ध्रुव जुरेल याचं..कारण पहिल्या डावात इंग्लंडने १० गडी गमवून ३५३ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना १६१ धावांवर भारताच्या ५ विकेट गेल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीसाठी ध्रुव जुरेल आला. १० धावांची पार्टनरशिप होताच सरफराज खानच्या रुपाने सहावा धक्का बसला. त्यानंतर १७७ धावांवर आर अश्विन तंबूत परतला. त्यामुळे इंग्लंडकडे १६६ धावांची आघाडी होती. पण ध्रुव जुरेल उभा राहिला आणि त्याला कुलदीप यादवची साथ मिळाली. आठव्या गड्यासाठी दोघांनी ७६ धावांची भागीदारी केली. त्यानंतर आकाशदीपसोबत ४० धावांची भागीदारी केली. त्यामुळे आघाडी कमी होत ४६ धावांवर आली. तर दुसऱ्या डावात भारताच्या फिरकीपटूंनी इंग्लंडचा डाव १४५ धावांवर आटोपला आणि विजयासाठी १९१ धावांचं आव्हान मिळालं.
दुसऱ्या डावातही ध्रुव जुरेलची फलंदाजी निर्णायक ठरली. संघाची धावसंख्या ८४ असताना यशस्वी जयस्वाल बाद झाला आणि चित्रच पालटलं. १२० धावांवर पाच गडी अशी स्थिती झाली. त्यामुळे आणखी एक विकेट पडली असती तर इंग्लंडला विजय शक्य झाला असता. पण शुबमन गिलला ध्रुव जुरेलची साथ मिळाली. सहाव्या गड्यासाठी दोघांनी विजयी पार्टनरशिप केली. दोघांनी ७२ धावांची भागीदारी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. शुबमन गिलने नाबाद ५२, तर ध्रुव जुरेलने नाबाद ३९ धावांची खेळी केली. ध्रुव जुरेलला या कामगिरीसाठी सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
“मी परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून खेळत होतो. पहिल्या डावात आम्हाला धावांचा पाठलाग करताना असताना एक गोष्टी लक्षात होतं की दुसऱ्या डावातही फलंदाजी करायची आहे. म्हणून प्रत्येक धाव आमच्यासाठी महत्त्वाची होती. मी काही भागीदारी केल्या त्यामुळे धावांमद्ये त्यांचंही श्रेय आहे. मी फक्त बॉल बघायचो आणि त्या पद्धतीने खेळायचो. त्यासाठी मी काही जास्त विचार केला नाही. दुसऱ्या डावात शुबमन गिलसोबत चांगला संवाद झाला. आम्ही विजयी धावांचा पाठलाग करताना १० धावांचा सेट तयार केला होता आणि त्या पद्धतीने आम्ही फलंदाजी करत होतो.”, असं ध्रुव जुरेल याने सांगितलं.