IND vs ENG : इंग्लंडची बेझबॉल रणनिती तिसऱ्या दिवशी फूसsss, पहिल्या डावात 126 धावांची आघाडी
भारत इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना सुरु असून पहिला डाव संपला आहे. पहिल्यात डावात टीम इंडियाला मोठी आघाडी मिळाली आहे. भारताने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. तर इंग्लंडचा संघ 319 धावा करू शकला. टीम इंडियाकडे आता 126 धावांची आघाडी आहे.
मुंबई : भारत इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियासमोर बेझबॉल रणनितीने नांगी टाकली. दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडचा संघ मजबूत स्थितीत होता. इंग्लंडने 2 गडी बाद 207 धावा केल्या होत्या. त्यामुळे तिसऱ्या दिवशी आरामात 400 धावांचा पल्ला गाठेल असं वाटत होतं. कारण बेझबॉल स्ट्रॅटर्जीपुढे भारतीय गोलंदाज हतबल झाले होते. त्यात आर अश्विन कौटुंबिक कारणामुळे सामन्यातून बाहेर पडला. त्यामुळे आपसूक तिसऱ्या दिवशी भारतावर दडपण होतं. पण आर अश्विनची उणीव कुलदीप यादव, जडेजा आणि सिराजने जाणवू दिली नाही. इंग्लंचा संपूर्ण संघ 319 धावांवर बाद केला. त्यामुळे पहिल्या डावात टीम इंडियाकडे 126 धावांची आघाडी आहे. तिसऱ्या दिवशी विकेट गोलंदाजांच्या बाजूने झुकल्याचं दिसत आहे. त्यामुळे भारताने या धावसंख्येत आणखी 200 धावा जोडल्या तर विजयाचं गणित सोपं होईल. 400 करण्यात यश मिळवलं तर विजय भारताच्या बाजूने झुकेल. त्यामुळे आता भारतीय फलंदाजीकडे लक्ष लागून आहे.
इंग्लंडकडून बेन डकेट्स आणि बेन स्टोक्स वगळता एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. बेन डकेट्सने 151 चेंडूत 153 धावा केल्या. तर कर्णधार बेन स्टोक्सने 89 चेंडूचा सामना करत 41 धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त एकही खेळाडू तिसऱ्या दिवशी दम दाखवू शकला नाही. निम्म्याहून अर्धा संघ तर एकेरी धाव करून तंबूत परतला. मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 गडी बाद केले. तर कुलदीप यादव आणि जडेजाने प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर जसप्रीत बुमराह आणि आर अश्विनला एक गडी बाद करण्यात यश आलं.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड, जेम्स अँडरसन