IND vs ENG : यशस्वी जयस्वालला बाद करण्यासाठी इंग्लंडचा रडीचा डाव, कॅमेऱ्याने चूक रंगेहाथ पकडली
पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-1 ने आघाडी घेतल्यानंतर इंग्लंडचा संघ आता रडीचा डाव खेळत आहे. तीन सामन्यात डोकेदुखी ठरलेल्या यशस्वी जयस्वालला बाद करण्यासाठी मोठी खेळी केली. मात्र कॅमेऱ्याने इंग्लंडचा प्लान उद्ध्वस्त करत जयस्वालला पुन्हा खेळण्याची संधी दिली.
मुंबई : चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा सामना इंग्लंडच्या पारड्यात झुकलेला राहीला. इंग्लंडने पहिल्या दिवशी 302 धावांवर 7 गडी बाद अशी खेळी केली. दुसऱ्या दिवशी यात आणखी 51 धावांची भर पडली आणि सर्वबाद 353 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला पहिलाच झटका रोहित शर्माच्या रुपाने मिळाला. अवघ्या 4 या धावसंख्येवर रोहित शर्मा तंबूत परतला. त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिल यांनी मोर्चा सांभाळला. त्यामुळे यशस्वी जयस्वाल बाद करण्यासाठी इंग्लंडने सर्वोतोपरी प्रयत्न केले. यशस्वी-गिल जोडी जमली तर डोकेदुखी ठरू शकते याची त्यांना पूर्ण कल्पना होती. इंग्लंडने 20 वं षटक ओली रॉबिन्सनला सोपवलं होतं. ऑफ स्टंफबाहेरील चेंडू मारताना कट लागली थेट विकेटकीपरच्या दिशेने गेला. फोक्स चेंडू पकडला आणि पंचांना काही कळायच्या आधीच जल्लोष करण्यास सुरुवात केली. त्यामुळे भारताला दुसरा धक्का बसला असंच क्रीडाप्रेमींना वाटलं. पण तिसऱ्या पंचांकडे दाद मागितल्यानंतर कॅमेऱ्यात सर्वकाही उघड झालं.
यशस्वी जयस्वालच्या बॅटला लागलेला चेंडू फोक्सच्या ग्लोव्हजमध्ये थेट गेलाच नव्हता. एक टप्पा पडत त्याने झेल घेतला होता. तिसऱ्या पंचांनी तात्काळ नाबाद असल्याचं जाहीर केलं आणि इंग्लंडच्या खेळाडूंचा चेहरा पडला. यशस्वी जयस्वालने तेव्हा 60 चेंडूत 40 धावांची खेळी केली होती. यात पाच चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. त्यानंतर यशस्वी जयस्वाल शोएब बशीरच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. तेव्हा त्याने 117 चेंडूत 73 धावांची खेळी केली होती. यात 8 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.
This is morally out clean catch by Ben foakes of yashasvi Jaiswal #INDveng pic.twitter.com/we2mGKiqzf
— Somnath Chakraborty (@Somnath44333169) February 24, 2024
यशस्वी जयस्वाल सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. या मालिकेत त्याने दोन द्विशतकं ठोकली आहेत. विशाखापट्टणम कसोटीत 209 धावा, तर राजकोट कसोटीत 214 धावांची खेळी खेळला होता. दरम्यान दुसऱ्या दिवसअखेर भारताने 7 गडी बाद 219 धावा केल्या आहेत. तर इंग्लंडकडे अजूनही 134 धावांची आघाडी आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप, मोहम्मद सिराज.
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, ऑली रॉबिन्सन, शोएब बशीर, जेम्स अँडरसन