मुंबई: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) दोन्ही संघ शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी सज्ज आहेत. इंग्लंडने नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडच्या संघाचा (ENG vs NZ) 3-0 ने धुव्वा उडवला. भारतही मुख्य कसोटी सामन्याआधी चार दिवसाचा एक सराव सामना खेळला आहे. भारत या कसोटी मालिकेत (Test Series) 2-1 ने आघाडीवर आहे. भारताकडे तब्बल 15 वर्षांनी इंग्लंड मध्ये कसोटी मालिका जिंकण्याची संधी आहे. पण भारतासमोरच आव्हान सोपं नसणार आहे. कारण इंग्लंडचा संघही चांगल्या फॉर्म मध्ये आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही आघाड्यांवर हा संघ संतुलित आहे. त्या तुलनेत टीम इंडियाच्या फलंदाजांचा फॉर्मसाठी संघर्ष सुरु आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी हे टॉप ऑर्डरचे फलंदाज सराव सामन्यात आपली छाप उमटवू शकले नव्हते.
इंग्लंडला पराभूत करण्यासाठी भारतीय संघाला आपल्या खेळाचा स्तर उंचावावा लागणार आहे. जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स सारखे फलंदाज इंग्लंडकडे आहे. त्यांना रोखण्यासाठी दर्जेदार गोलंदाजीवर भर द्यावा लागेल, तसे गोलंदाज निवडावे लागतील. एजबॅस्टनची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करते. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनाला तसे गोलंदाज निवडावे लागतील.
सध्या भारतीय संघाडकडे जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर यांच्या रुपाने अनेक वेगवान गोलंदाजांचे पर्याय उपलब्ध आहेत. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांचं प्लेइंग-11 मधील स्थान निश्चित आहे. पण अन्य दोन गोलंदाज कोण असतील? हा प्रश्न आहे.
या महत्त्वाच्या सामन्यासाठी संघात योग्य वेगवान गोलंदाजांची निवड होणं, आवश्यक आहे. त्यासाठी अजित आगरकर यांनी कोच राहुल द्रविड यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. अजित आगरकर भारताचे माजी वेगवान गोलंदाज आहेत. टीम मध्ये तिसरा गोलंदाज म्हणून अजित आगरकर यांनी मोहम्मद सिराजला पसंती दिलीय. चौथा गोलंदाज म्हणून त्यांनी शार्दुल ठाकूरची निवड केलीय.
“मागच्यावर्षी इंग्लंडमध्ये चार कसोटी सामन्यांमध्ये मोहम्मद सिराजने चांगली गोलंदाजी केली होती. सध्याच्या घडीला त्याच्या गोलंदाजीत बरीच सुधारणा झाली आहे. त्यामुळे सिराजला बाहेर बसवण्याचं मला काही कारण दिसत नाही” असं अजित आगरकर म्हणाले. “बॉल जुना झाल्यानंतर तो तुमच्यासाठी कठीण काम करु शकतो. वेगात आणि दीर्घ स्पेलमध्ये गोलंदाजी करु शकतो. तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून सिराजचा संघात समावेश केला नाही, तर मला नक्कीच आश्चर्य वाटेल” असं अजित आगरकर यांनी म्हटलं आहे.