IND vs ENG : 2022 वर्ल्डकप उपांत्य फेरीसारखंच घडलं, रोहित शर्माचं पुन्हा निघालं नशिब फुटकं
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातील नाणेफेकीचा कौल झाला आहे. इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. जोस बटलरच्या या निर्णयानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या पोटात गोळा आला आहे. 2022 वर्ल्डकपच्या आठवणी यामुळे ताज्या झाल्या आहेत.
टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात होत आहे. या सामन्यात वारंवार पावसाचा खंड पडल्याने नाणेफेक होण्यास उशीर झाला. दरम्यान, भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजून 45 मिनिटांनी टॉस झाला आणि नको तेच झालं. नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला. अगदी टी20 वर्ल्डकप 2022 सारखंच झालं आहे. तेव्हाही कर्णधार रोहित शर्मा आणि जोस बटलर हे आमनेसामने होते. जोस बटलरने नाणेफेकीचा कौल जिंकताच प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर रोहित शर्माच्या वाटेला 2022 वर्ल्डकप प्रमाणे फलंदाजी आली. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांची धाकधूक वाढली आहे. पुन्हा तसंच काहीसं झालं तर अशी चिंता त्यांना खात आहे. पण सकारात्मक बाब म्हणजे जोस बटलरचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय मनासारखा झाल्याचं रोहित शर्माने सांगितलं. जोस बटलरने सांगितलं की, “आम्ही प्रथम गोलंदाजी करू. खेळपट्टी चांगली दिसत आहे, बाऊन्स कमी असेल, आजूबाजूला पाऊस असल्याने, आम्हाला वाटले की प्रथम गोलंदाजी करण्याचा थोडा फायदा होईल. आम्ही एका महान संघाविरुद्ध खेळत आहोत. परंतु आम्ही उत्कृष्ट शिखरावर आहोत आणि आज आम्ही त्याच प्लेइंग इलेव्हनसोबत खेळत आहोत. आम्ही उपांत्य फेरीत खेळण्यासाठी उत्सुक आहोत. आमच्यापैकी काही याआधीही येथे आले आहेत.”
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने सांगितलं की, “आम्ही प्रथम फलंदाजी केली असती, हवामान चांगले दिसत आहे, जे व्हायचे होते ते झाले आहे. आम्हाला फळ्यावर धावा काढायच्या आहेत. खेळ सुरू असताना खेळपट्टीची गती कमी होते. अशा प्रकारच्या स्पर्धेत खेळण्याचे आव्हान, भरपूर प्रवास करावा लागला. चांगले क्रिकेट खेळण्याची ही संधी आहे. आम्हाला खूप पुढे विचार करायचा नाही. आम्ही त्याच प्लेइंग 11 सोबत मैदानात उतरू.”
दोन्ही संघांची प्लेइंग 11
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह.
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, जोस बटलर (विकेटकीपर/कर्णधार), जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, रीस टोपले.