IND vs ENG : टीम इंडियाच्या Playing XI बाबत डोकेदुखी, इशांत-सिराजमध्ये मुकाबला, सुंदर-अक्षरमध्येही टक्कर
इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी (India vs England) आता काही तास शिल्लक राहिले आहेत.
चेन्नई : इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी (India vs England) आता काही तास शिल्लक राहिले आहेत. टीम इंडिया आणि इंग्लंड दोन्ही संघ आमनेसामने भिडण्यासाठी सज्ज आहेत. कोरोनानंतर जवळपास वर्षभरानंतर टीम इंडिया भारतात खेळणार आहे. स्टेडियमच्या (MA Chidambaram) एकूण क्षमतेच्या 50 टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी मिळाली आहे. यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्येही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. टीम इंडियाने 1 फेब्रुवारीला मैदानात या कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर जोरदार सराव सुर केला आहे. पहिला कसोटी साम्याला काहीच तास शिल्ल आहेत तरीदेखील अद्याप पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची Playing XI ठरलेली नाही. (IND vs ENG Mohammed Siraj Ishant Sharma locked in battle for Chennai test slot)
भारतीय संघातील अनेक खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. काही खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी दुखापतग्रस्त होते, त्यापैकी काहीजण तंदुरुस्त असून इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध आहेत. तसेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत नवोदित खेळाडूंनी चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे संघातील अंतिम 11 खेळाडूंची निवड करणं भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांच्यासमोरचं मोठं आव्हान असणार आहे.
टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह हा इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत खेळणार आहे. तर बुमराहनंतर दुसरा प्रमुख गोलंदाज म्हणून ईशांत शर्मा किंवा मोहम्मद सिराज यापैकी एकाची निवड केली जाणार असल्याचे बोलले जात आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ईशांतच्या अनुपस्थितीत सिराजने भारतीय गोलंदाजीची एक बाजू चोखपणे सांभाळली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या गाबा कसोटीत (चौथ्या कसोटी सामन्यात) तिसऱ्या डावात सिराजने 5 विकेट घेत त्याची ताकद सिद्ध केली आहे. तर ईशांत शर्मा टीम इंडियातील सर्वात अनुभवी गोलंदाज आहे. या दोघांपैकी एकाची निवड करणं भारतीय कर्णधाराला जड जाणार आहे.
फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन भारतीय फिरकीची बाजू सांभाळणार आहे. त्याच्या साथीला दुसरा फिरकीपटू म्हणून कोणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या जागेसाठी वॉशिंग्टन सुंदर आणि अक्सर पटेल या दोघांमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. चेन्नईमधील चेपॉकची खेळपट्टी फिरकीला मदत करते. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ तीन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरेल असे बोलले जात आहे.
डावखुऱ्या फिरकीपटूची निवड करणं प्रशिक्षक आणि कर्णधारासमोरचं मुख्य आव्हान असणार आहे. वॉशिंग्टन सुंदर आणि अक्सर पटेल दोघेही चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. अश्विनची साथ देण्यासाठी कुलदीप यादवची निवड झाली तर तिसरा फिरकीपटू म्हणून सुंदर आणि अक्सर यापैकी एकालाच संधी मिळू शकते. अनेक क्रीडा तज्ज्ञांच्या मते भारतीय संघ चेन्नई कसोटी सामन्यात अश्विन, कुलदीप आणि वॉशिंग्टन सुंदर या तीन फिरकीपटूंसह मैदानात उतरेल.
Day 1 of our nets session in Chennai and it is Head Coach @RaviShastriOfc who welcomes the group with a rousing address. #TeamIndia #INDvsENG pic.twitter.com/eueKznxrMa
— BCCI (@BCCI) February 2, 2021
महत्वाच्या खेळाडूंचे पुनरागमन
या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, केएल राहुल, इशांत शर्मा, हार्दिक पंड्याचं पुनरागमन झालं आहे. दुखापतीमुळे केएल राहुल आणि इशांत शर्माला ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेला मुकावे लागले होते. तर पहिल्या कसोटीनंतर विराट मायदेशी परतला होता. तसेच इंग्लंडच्या खेळाडूंनाही सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे. टीम इंडियाने कांगारुंचा त्यांच्याच भूमित कसोटी मालिकेत पराभव केला. तर इंग्लंडनेही श्रीलंकेवर 2-0 एकतर्फी फरकाने टेस्ट सीरिजमध्ये विजय मिळवला.
दरम्यान या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. यामधील पहिले 2 सामने हे चेन्नईतील चेपॉक स्टेडियममध्ये खेळण्यात येणार आहेत. तर उर्वरित 2 सामन्यांचं आयोजन हे अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियममध्ये केलं आहे.
कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिला सामना-चेन्नई-5-9 फेब्रुवारी दूसरा सामना – चेन्नई-13ते17 फेब्रुवारी तिसरा सामना-अहमदाबाद- 24 ते 28 फेब्रुवारी चौथा सामना-अहमदाबाद-4 ते 8 मार्च
पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्सर पटेल.
पहिल्या 2 टेस्टसाठी इंग्लंड टीम : जो रूट (कर्णधार), रोरी बर्न्स, डॉम सिबले, बेन स्टोक्स, जॉस बटलर, जोफ्रा आर्चर, मोईन अली, जॅक क्रॉले, ओली स्टोन, ख्रिस वोक्स, बेन फोक्स, जेम्स एंडरसन, डॉम बेस, डॅन लॉरेन्स, स्टुअर्ट ब्रॉड आणि जॅक लीच.
संबंधित बातम्या :
England Tour India | इंग्लंडच्या भारत दौऱ्याची घोषणा, ‘या’ 3 स्टेडियमध्ये खेळण्यात येणार सामने
India vs England | इंग्लंडचा कसोटी मालिकेत 3-0 ने पराभव होणार, गौतम गंभीरची भविष्यवाणी
(IND vs ENG Mohammed Siraj Ishant Sharma locked in battle for Chennai test slot)