IND vs ENG : रोहित शर्माने विजयाचं श्रेय दिलं या खेळाडूला, मालिका विजयानंतर सांगितलं की..
भारताने इंग्लंडविरुद्धची चौथा कसोटी सामना जिंकत मालिका खिशात घातली. पाच सामन्यांची मालिका ३-१ ने जिंकली. चौथ्या सामन्यात भारताची नाजूक स्थिती होती. पण ध्रुव जुरेलने पहिल्या डावात जबरदस्त कामगिरी करत भारताचा डाव सावरला आणि विजय सोपा झाला.
मुंबई : भारत विरुद्ध इंग्लंड चौथा कसोटी सामना भारताने ५ गडी राखून जिंकला. पहिल्या डावात भारताची नाजूक स्थिती होती. इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि ३५३ धावांचा डोंगर उभा केला. जो रुटच्या शतकी खेळीमुळे टीम इंडियाला बॅकफूटवर ढकललं. या धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात अडखळत झाली. एक क्षण तर असं वाट होती की इंग्लंडकडे मोठी आघाडी असेल. पण ध्रुव जुरेलने १४९ चेंडूंचा सामना करत ९० धावांची खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाला ३०७ धावांपर्यंत मजल मारता आली. असं असलं तरी इंग्लंडकडे ४६ धावांची आघाडी होती. त्यात खेळपट्टी पाहता २०० पार धावा झाल्या तर विजय कठीण होईल याची जाणीव होती. पण आर अश्विनच्या फिरकीपुढे इंग्रजांचं काही चाललं नाही. निम्मा संघ एकट्या आर अश्विनने माघारी पाठवला. त्याला कुलदीप यादवची साथ मिळाली त्यानेही ४ गडी बाद केले. तर रवींद्र जडेजाला एक गडी बाद करण्यात यश आलं. त्यामुळे इंग्लंडला दुसऱ्या डावात सर्वबाद १४५ धावा करता आल्या आणि विजयासाठी १९२ धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान भारताने पाच गडी गमवून पूर्ण केलं. या विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने आपलं मन मोकळं केलं.
काय म्हणाले कर्णधार रोहित शर्मा?
“ही खूप कठीण मालिका होती. पण जेव्हा मालिका जिंकता तेव्हा बरं वाटतं. सामन्यात खूप आव्हानं आली पण आम्ही प्रतिसाद दिला. या मुलांना इथे रहायचं आहे, मोठं व्हायचं आहे. देशांतर्गत सर्किट, स्थानिक क्लब-क्रिकेट आणि येथे येणे हे एक मोठे आव्हान आहे.त्यांना हवे तसे वातावरण आपण दिले पाहिजे. आपण त्यांच्याशी बोलत राहू शकत नाही. पण त्यांना काय करायचे आहे हे ते अगदी स्पष्ट आहेत. जुरेलने संयमी खेळ केला. तसेच चारी बाजूने फटकेबाजी केली. त्याची पहिल्या डावातील ९० धावांची खेळी महत्त्वाची होती आणि पुन्हा गिलसह दुसऱ्या डावातही त्याने चांगली खेळी केली.”, असं कर्णधार रोहित शर्मा याने सांगितलं.
दुसऱ्या डावात विजयी धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची स्थिती एका क्षणी नाजूक झाली होती. रजत पाटिदार आणि सरफराज खान यांना खातंही खोलता आलं नाही. त्यामुळे शुबमन गिल आणि ध्रुव जुरेलकडून अपेक्षा वाढल्या. या दोघांनी मोक्याची विजयी भागी दारी केली. या दोघांनी ७२ धावांची भागीदारी करून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. शुबमन गिल नाबाद ५२ आणि ध्रुव जुरेल नाबाद ३९ धावांवर राहिले. भारताने पाच सामन्यांची मालिका ३-१ ने आपल्या खिशात घातली आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग ११
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप, मोहम्मद सिराज.
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, ऑली रॉबिन्सन, शोएब बशीर, जेम्स अँडरसन