IND vs ENG : “मी जडेजाला सांगितलं होतं की, फलंदाजी करताना..”, खेळ संपल्यानंतर सरफराजने सर्व काही सांगून टाकलं

| Updated on: Feb 15, 2024 | 7:00 PM

भारत इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यातील पहिल्या दिवसावर टीम इंडियाची मजबूत पकड दिसली. सुरुवातीला डाव गडबडला होता. पण रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजाने डाव सावरला. तर सरफराज खानने उत्तम साथ दिली. पण दुर्दैवाने धावचीत होत तंबूत परतला. त्यानंतर त्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

IND vs ENG : मी जडेजाला सांगितलं होतं की, फलंदाजी करताना.., खेळ संपल्यानंतर सरफराजने सर्व काही सांगून टाकलं
Follow us on

मुंबई : भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि सरफराज खान यांनी डाव सावरला. पहिल्या दिवशीचा खेळ या तीन खेळाडूंनी गाजवला. रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी शतकी खेळी केली. तर सरफराज खान 62 धावा करून धावचीत झाला. रवींद्र जडेजाच्या चुकीच्या कॉलमुळे त्याला बाद होत तंबूत परतावं लागलं. पण तिथपर्यंत सरफराज खानने आपली खेळी केली होती. पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतकी खेळी करून आपली निवड योग्य असल्याचं सिद्ध करून दिलं. एकीकडे गिल वारंवार फेल होत असताना मधल्या फळीत सरफराज आणि रवींद्र जडेजा यांनी डाव सावरला आहे. 3 बाद 33 धावांवरून संघाची धावसंख्या 5 बाद 326 पर्यंत पोहोचवण्यात मदत केली. सरफराज खानने 48 चेंडूत अर्धशतक ठोकलं. सर्वात जलद अर्धशतक ठोकणाऱ्या हार्दिक पांड्याच्या पंगतीत येऊन स्थान मिळवलं आहे. या खेळीदरम्यान रवींद्र जडेजाची उत्तम साथ लाभली. सामन्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत त्याने ही कबुली दिली आहे.

सरफराज खान याने पाचव्या गड्यासाठी रवींद्र जडेजासोबत 77 धावांची भागीदारी केली. यावेळी रवींद्र जडेजासोबत काय संवाद झाला ते सरफराजने सांगितलं. “मी जड्डू भाईला सांगितले की, फलंदाजी करताना माझ्याशी बोलत राहा. कारण मला फलंदाजी करताना बोलायला आवडते. आज फलंदाजी करताना त्याने मला खूप साथ दिली. सुरुवातीला अस्वस्थता होती पण नंतर ती सामान्य झालो. “, असं सरफराज खान म्हणाला.

“जेव्हा जेव्हा मला लूज बॉल मिळाला तेव्हा मी जोरदार प्रहार केला. “, असं सरफराज खान याने सांगितलं. तसेच पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येण्यासाठी चार तास पॅड लावून बसलो होतो. “मी चार तास पॅड बांधून बसलो होतो. मी स्वत:ला सांगितलं की संयम ठेव. अजून काही वेळ निघून जाऊ दे.” असंही सरफराज खान याने सांगितलं. सरफराज खानने 66 चेंडूत 62 धावांची खेळी केली. या खेळीत 9 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.  दरम्यान सरफराज खान रनआऊट झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा यानेही संताप व्यक्त केला.