एडिलेड: ऑस्ट्रेलियात सुरु असलेला टी 20 वर्ल्ड कप शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. टीम इंडिया दिमाखात सेमीफायनलमध्ये दाखल झाली आहे. टीम इंडियाचा सामना इंग्लंड विरुद्ध होणार आहे. एडिलेड ओव्हलच्या मैदानात ही मॅच होईल. ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या वर्ल्ड कपमध्ये एका गोष्टीमुळे सातत्याने बाधा निर्माण झालीय. तो म्हणजे पाऊस. पावसाने यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमधली अनेक समीकरणं बिघडवली आहेत.
वेगळे नियम बनवलेत का?
सुपर 12 राऊंडमध्ये पावसामुळे काही सामने रद्द झाले. त्यामुळे दोन्ही टीम्सना विभागातून 1-1 पॉइंट द्यावा लागला. पावसामुळे सेमीफायनल गाठण्याची समीकरण बदलली. काही सामन्यात पाऊस हिरो तर काही सामन्यात खलनायक ठरला. आता याच पावसामुळे सेमीफायनलच गणित सुद्धा बिघडणार का? आयसीसीने सेमीफायनल आणि फायनलसाठी काही वेगळे नियम बनवलेत का? ते जाणून घेऊया.
आता सुपर 12 चा नियम नाही
सुपर 12 साठी जे नियम होते, त्यानुसार पावसामुळे सामना झाला नाही, तर पॉइंटसची समसमान विभागणी व्हायची. दोन्ही टीम्सना एक-एक पॉइंट दिला जायचा. पण आता सेमीफायनल आणि फायनलच्यावेळी पाऊस झाला तर काय?
कमीत कमी 10 ओव्हर्सचा खेळ गरजेचा
आयसीसीने दोन्ही सेमीफायनल आणि फायनलसाठी रिजर्व डे ठेवला आहे. म्हणजे पावसामुळे सामना सुरु झाला नाही, तर दुसऱ्यादिवशी सामना होईल. सामन्यादरम्यान पाऊस झाला, तर दोन्ही इनिंग्समध्ये पाच-पाच ओव्हरचा खेळ होण्याची वाट पाहिली जाणार नाही. सेमीफायनल आणि फायनलसाठी दोन्ही इनिंग्समध्ये कमीत कमी 10 ओव्हर्सचा खेळ गरजेचा आहे. असं झालं नाही, तर मॅच रिजर्व डे च्या दिवशी सुरु होईल.
13 नोव्हेंबरला फायनल
टी 20 वर्ल्ड कप 2022 ची पहिली सेमीफायनल सिडनीत 9 नोव्हेंबरला होईल. दुसरी सेमीफायनल 10 नोव्हेंबरला एडिलेड ओव्हलमध्ये होईल. वर्ल्ड कपची फायनल 13 नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानात होईल. भारतीय वेळेनुसार, दुपारी 1.30 वाजता फायनल सुरु होईल.
या चार टीम्स सेमीफायनलमध्ये
न्यूझीलंड, इंग्लंड, भारत आणि पाकिस्तान या चार टीम्स सेमीफायनलमध्ये पोहोचल्या आहेत. उद्या बुधवारी न्यूझीलंड आणि पाकिस्तानमध्ये सेमीफायनलचा पहिला सामना होईल. त्यानंतर भारत आणि इंग्लंडमध्ये सेमीफायनल मॅच खेळली जाईल.