IND vs NED | टीम इंडियाचा नेदरलँड्सवर 160 धावांनी धमाकेदार विजय, वर्ल्ड कपमध्ये सलग नववा विजय
India vs Netherlands | टीम इंडियाने नेदरलँड्सवर विजय मिळवला आहे. कॅप्टन रोहित आणि विराट कोहली या जोडीने बॅटिंगसह बॉलिंगने खास योगदान दिलं. भारताला आता फक्त दोन विजय मिळवायचे आहेत. ते दोन विजय म्हणजे मोठं स्वप्न असणार आहे.
बंगळुरु | टीम इंडियाने नेदरलँड्सवर आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात 160 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने नेदरलँड्सला विजयासाठी 411 धावांचं आव्हान दिलं होतं. नेदरलँड्स क्रिकेट टीम या धावांचा पाठलाग करताना 250 धावांवर ऑल आऊट झाली. टीम इंडियाने या विजयासह वर्ल्ड कप स्पर्धेत इतिहास रचला. टीम इंडियाने या 13 व्या वर्ल्ड कपमध्ये सलग सर्वाधिक 9 सामने जिंकण्याचा विक्रम केला. आता टीम इंडिया सेमी फायनलमध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये भिडणार आहे. हा सामना 15 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे.
नेदरलँड्सची बॅटिंग
भारताच्या 411 धावांचा पाठलाग करताना नेदरलँड संघाची खराब सुरूवात झाली होती. मोहम्मद सिराज याने आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये भारताला पहिलं यश मिळवून दिलं होतं. त्यानंतर मॅक्स ओडाऊड आणि कॉलिन अकरमन यांनी डाव सांभालळा होता. कुलदीप यादव याने अकरमन याला 35 धावांवर आऊट करत भारताला दुसर यश मिळवून दिलं. त्यापाठोपाठ जडेजाने ओडाऊड याला चारीमुंड्या चीत करत नेदरलँड्सला तिसरा झटका दिला.
चौथ्या विकेटसाठी सायब्रँड एंजेलब्रेक्ट आणि स्कॉट एडवर्ड्स यांच्यात भागीदारी झाली होती. ही जोडी काही फुटत नव्हती. त्यावेळी विराट कोहली याने कॅप्टन स्कॉट एडवर्ड्सला आऊट करत यश मिळवून दिलं. यानंतर फक्त तेजा निदामनुरु याची 54 धावांची अर्धशतकी खेळी सोडता इतर कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. टीम इंडियाकडून चौघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव या चौकडीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी अनपेक्षितपणे प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
टीम इंडियाची बॅटिंग
त्याआधी टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय केला. टीम इंडियाने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 410 धावा केल्या. टीम इंडियाकडून श्रेयस अय्यर याने सर्वाधिक नाबाद 128 धावांची खेळी केली. केएल राहुल याने 102 धावांची शतकी खेळी केली. शुबमन गिल आणि विराट कोहली या दोघांनी प्रत्येकी 51-51 धावांचं अर्धशतकी योगदान दिलं. कॅप्टन रोहित शर्मा याने 61 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादव 2 धावांवर नाबाद परतला. नेदरलँड्कडून बास डी लीडे याने सर्वाधिक 2 विकेट्स मिळवल्या. रोएलॉफ व्हॅन डर मर्वे आणि पॉल व्हॅन मीकरेन या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.
नेदरलँड्स प्लेईंग ईलेव्हन | स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन आणि विकेटकीपर), वेस्ली बॅरेसी, मॅक्स ओडाऊड, कॉलिन अकरमन, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, बास डी लीडे, तेजा निदामनुरु, लोगान व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त आणि पॉल व्हॅन मीकरेन.