INDvsNZ: विराट कोहली याला न्यूझीलंड विरुद्ध मोठा विक्रम करण्याची संधी
टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज विराट कोहलीचं लक्ष मोठ्या विक्रमावर असणार आहे. विराटला न्यूझीलंड विरुद्धच्या या 3 सामन्यांच्या मालिकेत भीमपराक्रम करण्याची सुवर्णसंधी आहे.
हैदराबाद : बुधवारी 18 जानेवारीला भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिली मॅच खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघ हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये आमनेसामने भिडणार आहेत. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर न्यूझीलंडची सूत्रं टॉम लॅथमच्या हाती असतील. या सामन्यात टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज विराट कोहलीचं लक्ष मोठ्या विक्रमावर असणार आहे. विराटला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25 हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी अवघ्या 119 धावांची गरज आहे. विराट सध्या तुफान फॉर्मात आहे. त्यानुसार विराटसाठी 119 धावा म्हणजे किस झाड की पत्ती.
विराटला या 119 धावा करण्यासाठी 3 सामन्यांची मुदत आहे. विराटने 35 दिवसांमध्ये 3 एकदिवसीय शतकं ठोकली आहेत. त्यानुसार विराटचा पुन्हा जम बसला, तर तो न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात महारेकॉर्ड करुन टाकेल.
विराट कोहलीची कारकीर्द
विराटने आतापर्यंत 268 एकदिवसीय सामन्यांमध्ये 12 हजार 754 धावा केल्या आहेत. यामध्ये विराटने 58.68 च्या सरासरी आणि 93.68 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. विराटचा वनडे क्रिकेटमध्ये 183 धावा ही सर्वोच्च वैयक्तिक खेळी आहे. याशिवाय विराटने 46 एकदिवसीय शतक ठोकले आहेत. तर 64 अर्धशतकांचाही समावेश आहे.
तसेच 104 कसोटींमध्ये 8 हजार 119 धावा केल्या आहेत. तर 115 टी 20 सामन्यांमध्ये 4 हजार 8 रन्स आहेत. सध्या विराट 25 हजार या धावांच्या आकड्यापासून फक्त 119 धावाच दूर आहे.
दरम्यान टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना हैदराबादेत पार पडणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. याशिवाय हॉटस्टारवर पाहता येईल.
न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, इशान किशन, विराट कोहली, रजत पाटीदार, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक.
टीम न्यूझीलंड
टॉम लॅथम (कॅप्टन/विकेटकीपर), फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर, जेकब डफी, डग ब्रेसवेल, मार्क चॅपमन आणि हेन्री शिपली.