IND vs NZ : टीम इंडियाला झटपट 4 झटके, रोहितसेना पुन्हा अडचणीत, न्यूझीलंडचं कमबॅक
India vs New Zealand 1st Test Day 4 : टीम इंडियाने चौथ्या दिवसाची अप्रतिम सुरुवात केली. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात टीम इंडियाने झटपट 4 विकेट्स गमावल्या.

न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या कसोटीतील चौथ्या दिवशी सर्फराज खान आणि ऋषभ पंत या जोडीने अप्रतिम सुरुवात करुन टीम इंडियाला अडचणीतून बाहेर काढलं होतं. न्यूझीलंडने पहिल्या डावात घेतलेल्या 356 धावांच्या प्रत्युत्तरात या पंत-सर्फराजन खान जोडीने टीम इंडियाला आघाडी मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली. या दोघांनी पहिल्या सत्रात एकही विकेट न गमावता न्यूझीलंडची काही प्रमाणात कोंडी केली होती. मात्र दुसऱ्या सत्रातील अखेरच्या काही षटकांमध्ये नव्या चेंडूसह न्यूझीलंडने कमबॅक केलं आणि टीम इंडियाला पुन्हा एकदा बॅकफुटवर ढकललं आहे.
दुसऱ्या सत्रात 3 झटके
टीम इंडियाने अवघ्या 30 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट्स गमावल्या. सर्फराज खान, ऋषभ पंत आणि केएल राहुल हे तिघे आऊट झाले. सर्फराज आणि पंत या जोडीने चौथ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात केली. या दोघांनी अप्रतिम बॅटिंग केली मात्र टीम साऊथी या अनुभवी गोलंदाजाने ही जोडी फोडून काढली. टीमने सर्फराजला 150 धावांवर बाद केलं. सर्फराज आणि पंत या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 177 धावांची भागीदारी केली.
त्यानंतर पंत आणि केएल राहुल या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 25 धावा जोडल्या. त्यानंतर ऋषभ पंत विलियम ओरुर्केचा शिकार ठरला. पंत दुर्देवी ठरला. पंत 99 धावांवर बोल्ड झाला. पंतची नर्व्हस नाईंटी होण्याची ही सातवी वेळ ठरली. पंतनंतर केएल राहुलही आऊट झाला. विलियम ओ रुर्के यानेच केएलला टॉम ब्लंडेल याच्या हाती कॅच आऊट केलं. केएलने 12 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाची स्थितीत 6 बाद 438 झाली. यास टी ब्रेक झाला.
जडेजाही आऊट
टी ब्रेकनंतर आर अश्विन आणि रवींद्र जडेजा जोडी मैदानात आली. या दोघांकडून अनेक अपेक्षा होत्या. मात्र पुन्हा विलियमने घात केला. विलियमने रवींद्र जडेजाला 5 धावांवर विल यंग याच्या हाती कॅच आऊट केलं. त्यामुळे टीम इंडियाची स्थितीत 7 बाद 441 अशी झाली आहे. तर 85 धावांची आघाडी टीम इंडियाकडे आहे.आता टीम इंडियाला हा सामना जिंकायचा असेल, तर किमान 150 धावांची तरी आघाडी घ्यावी लागेल. आता भारताचे उर्वरित फलंदाज न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा कसा सामना करतात? याकडेच साऱ्यांच लक्ष असणार आहे.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टॉम लॅथम (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचीन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, टीम साउथी, एजाझ पटेल आणि विल्यम ओरूर्के.