IND vs NZ : न्यूझीलंड भारतात तब्बल 36 वर्षांनी विजयी, टीम इंडियाचा 8 विकेट्सने धुव्वा

| Updated on: Oct 20, 2024 | 12:51 PM

India vs New Zealand 1st Test Match Result : न्यूझीलंडने टीम इंडियावर मायदेशात 1988 नंतर मात केली आहे. किवींनी या विजयासह 3 मॅचच्या सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे.

IND vs NZ : न्यूझीलंड भारतात तब्बल 36 वर्षांनी विजयी, टीम इंडियाचा 8 विकेट्सने धुव्वा
new zealand cricket team
Image Credit source: bcci
Follow us on

न्यूझीलंड क्रिकेट टीमने टॉम लॅथमच्या नेतृत्वात इतिहास रचला आहे. न्यूझीलंडने भारत दौऱ्यातील कसोटी मालिकेची सुरुवात विजयाने केली आहे. न्यूझीलंडने बंगळुरुतील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियावर 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडला विजयासाठी 107 धावांचं आव्हान दिलं होतं. न्यूझीलंडने हे आव्हान 27.4 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं. न्यूझीलंडने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली तसेच 36 वर्षांची प्रतिक्षा संपवली. न्यूझीलंडचा हा भारतातील तिसरा आणि 1988 नंतरचा पहिला विजय ठरला.

रचीन रवींद्र गेमचेंजर

रचीन रवींद्र हा न्यूझीलंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला. रचीनने पहिल्या आणि दुसर्‍या डावात निर्णायक खेळी करत न्यूझीलंडच्या विजयाचा पाया रचला. रचीनने दुसऱ्या डावात नाबाद 39 धावा केल्या. तर पहिल्या डावात टीम साऊथीसोबत आठव्या विकेटसाठी 137 धावांची गेमचेंजिग पार्टनरशीप केली. या भागीदारीमुळे खऱ्या अर्थाने सामना न्यूझीलंडच्या बाजूने झुकला. रचीनने पहिल्या डावात शतकी खेळी केली. रचीनचं हे भारतातील पहिलं तर कसोटी कारकीर्दीतील दुसरं शतक ठरलं. रचीनने पहिल्या डावात 157 बॉलमध्ये 134 रन्स केल्या.

सामन्यात काय झालं?

पावसामुळे पहिल्या दिवसाचा संपूर्ण खेळ वाया गेला. दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय केला मात्र न्यूझीलंडने पहिल्या डावात रोहितसेनेला 46 रन्सवर गुंडाळलं. त्यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावात 402 धावा करत 356 धावांची भक्कम आघाडी घेतली. न्यूझीलंडने 233 वर 7 वी विकेट गमावली होती. मात्र रचीन आणि टीम साऊथी या दोघांनी आठव्या विकेटसाठी 137 धावांची भागीदारी केली. त्यामुळे न्यूझीलंडला 400 पार पोहचता आलं. न्यूझीलंडकडून पहिल्या डावात रचीन व्यतिरिक्त डेव्हॉन कॉनव्हे याने 91 तर टीम साऊथीने 65 धावा जोडल्या. तर टीम इंडियाकडून रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजने दोघांना आऊट केलं. तर जसप्रीत बुमराह आणि आर अश्विन या दोघांना 1-1 विकेट मिळाली.

टीम इंडियाने दुसऱ्या डावात 356 च्या प्रत्युत्तरात 462 धावा केल्या. मात्र टीम इंडियाने अखेरच्या 7 विकेट्स या अवघ्या 54 धावांच्या मोबदल्यात गमावल्या. या डावात भारतासाठी सर्फराज खान याने सर्वाधिक 150 धावांचं योगदान दिलं. ऋषभ पंत 99 धावांवर बाद झाला. तर विराट कोहली 70 आणि कॅप्टन रोहित शर्मा याने 52 धावांचं योगदान दिलं. त्यामुळे टीम इंडियाला 106 धावांची आघाडी मिळाल्याने न्यूझीलंडला 107 धावांचं माफक आव्हान मिळालं.

न्यूझीलंडचा भारतात 36 वर्षांनी विजय

न्यूझीलंडने हे आव्हान पाचव्या दिवशी 27.4 ओव्हरमध्ये 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. विल यंग आणि रचीन रवींद्र या दोघांनी विजयापर्यंत नेल. विलने नाबाद 48 आणि रचीनने 39 नॉट आऊट रन्स केल्या. तर त्याआधी डेव्हॉन कॉनव्हे याने 17 धावांचं योगदान दिलं. तर कॅप्टन टॉम लॅथम याला भोपळाही फोडता आला नाही. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह याने दोन्ही विकेट्स घेतल्या. दरम्यान मालिकेतील दुसरा सामना हा पुण्यात 24 ते 28 ऑक्टोबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टॉम लॅथम (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचीन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, टीम साउथी, एजाझ पटेल आणि विल्यम ओरूर्के.