IND vs NZ : हातातून गेलेल्या कसोटीत ऋषभ पंतची जबरदस्त खेळी, शतक हुकलं पण भारताचा डाव सावरला

| Updated on: Oct 19, 2024 | 3:37 PM

न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामन्यातील पहिला डाव भारतासाठी कटू स्वप्न होतं. संपूर्ण संघ अवघ्या 46 धावांवर बाद झाला होता. तर पाच खेळाडूंना आपलं खातंही खोलता आलं नव्हतं. पण दुसऱ्या डावात टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक केलं. सरफराज खाननंतर ऋषभ पंत शतकाच्या उंबरठ्यावर येऊन उभा होता. पण त्याचं शतक फक्त एका धावेने हुकलं.

IND vs NZ : हातातून गेलेल्या कसोटीत ऋषभ पंतची जबरदस्त खेळी, शतक हुकलं पण भारताचा डाव सावरला
Follow us on

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी मालिकेत चमत्कार घडावा असंच काहीसं घडलं आहे. पहिल्या डावात 46 धावांवर ऑलआऊट झाल्यानंतर टीम इंडिया कमबॅक करेल की नाही याबाबत शंका होती. त्यात न्यूझीलंडकडे 356 धावांची मजबूत आघाडी होती. त्यामुळे ही आघाडी मोडून मोठी धावसंख्या उभारणं म्हणजे कठीणच होतं. असं असूनही टीम इंडियाच्या खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली. यशस्वी जयस्वाल वगळता इतर आघाडीच्या खेळाडूंनी चांगलाच दम दाखवला. रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत यांनी अर्धशतकी खेळी केली. तर सरफराज खानने दीड शतक ठोकलं. त्यामुळे 356 धावांचा पल्ला पार करण्यात मदत झाली. ऋषभ पंत आणि सरफराज खान यांच्यातील पार्टनरशिप सर्वात महत्त्वाची ठरली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 177 धावांची भागीदारी केली. ऋषभ पंतने या भागीदारी आक्रमक फटकेबाजी केली. 105 चेंडूत 9 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 99 धावा करून बाद झाला. त्याचं शतक फक्त एका धावेने हुकलं. पण या 99 धावा शतकाच्या बरोबरीच्या आहेत असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. कारण पहिल्या डावातील टीम इंडियाचा खेळ पाहता असं कमबॅक करणं खरंच खूप कठीण होतं.

ऋषभ पंतने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत सहा शतकं ठोकली आहे. त्यामुळे त्याचं सातवं शतक फक्त एका धावेने हुकलं आहे. कसोटीत 99 धावांवर बाद होणारा ऋषभ पंत हा चौथा विकेटकीपर आहे. तर भारताचा चौथा विकेटकीपर आहे. 2005 मध्ये न्यूझीलंडचा ब्रँडन मॅकलम हा श्रीलंकेविरुद्ध 99 धावांवर बाद झाला होता. त्यानंतर महेंद्रसिंह धोनी 2012 मध्ये इंग्लंडविरुद्ध 99 धावांवर बाद झाला आहे. इंग्लंडचा बेअरस्टो 2017 मध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळताना 99 वर बाद झाला आहे. आता ऋषभ पंत हा या पंगतीत बसला असून 99 बाद होणार चौथा विकेटकीपर ठरला आहे.

ऋषभ पंतने कसोटीच्या तिसऱ्या डावात आतापर्यंत जबरदस्त खेळी केल्याचं पाच डावांच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. 2022 मध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्ध नाबाद 100 धावा, 2022 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 50 धावा, 2022 मध्ये इंग्लंडविरुद्ध 57 धावा, 2024 मध्ये बांगलादेशविरुद्ध 109 धावा आणि आता न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या डावात 99 धावांची खेळी केली आहे. ऋषभ पंत हा कसोटीत नर्वस 90 चा सातव्यांदा शिकार झाला आहे. या यादीत सचिन तेंडुलकर आघाडीवर आहे. सचिन तेंडुलकर 10, राहुल द्रविड 9, ऋषभ पंत 7, सुनील गावस्कर 5, एमएस धोनी 5, वीरेंद्र सेहवाग 5 वेळा नर्वस 90 चा शिकार झाला आहे.