INDvsNZ, 2nd ODI : उमरान की शार्दुल, दुसऱ्या वनडेत कुणाला मिळणार संधी? कोचने सांगितलंच
टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध 21 जानेवारीला दुसरा एकदिवसीय सामना खेळणार आहे. या सामन्यात उमरान मलिक आणि शार्दुल ठाकूर या दोघांपैकी कुणाला संधी देणार याबाबत बॉलिंग कोचने माहिती दिलीय.
रायपूर : टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रडत रडत विजय मिळवला. न्यूझीलंडच्या ब्रेसवेलने टीम इंडियाच्या गोलंदाजांना शेवटपर्यंत झुंजवलं. मात्र ब्रेसवेललाही शतकी खेळी करुनही न्यूझीलंडला विजयी करता आलं नाही. टीम इंडियाने या सामन्यात 12 धावांनी विजय नोंदवला. त्यामुळे टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.
आता दुसरा सामना हा शनिवारी 21 फेब्रुवारीला रायपूरमध्ये पार पडणार आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिका विजयाची संधी आहे. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणं अपेक्षित आहे. त्यातही गोलंदाजांमध्ये शार्दुल ठाकूर आणि उमरान मलिक या दोघांपैकी कुणाचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करायचा, असाही पेच आहे. यावर टीम इंडियाचे बॉलिंग कोच पारस म्हाम्ब्रे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला. या दरम्यान त्यांनी शार्दुल की उमरान या दोघांपैकी कुणाला संधी देणार आणि का देणार हे सांगितलं.
सामन्याआधी निर्णय होणार
“शार्दुलला निवडण्यामागे बॅटिंग हे एक कारण होतं. त्यामुळे आम्ही शार्दुलला निवडलं. शार्दुलमुळे फलंदाजी आणखी दमदार होते. आम्हाला खेळपट्टी पाहावी लागेल. त्यानंतरच टीम मॅनेजमेंट निर्णय घेईल. शार्दुलने भारतात चांगली कामगिरी केली आहे”, असं म्हाम्ब्रे म्हणाले.
म्हाम्ब्रे काय म्हणाले?
“उमरानने ज्या पद्धतीने स्वत:ची प्रगती केलीय, ते फार सुखावह आहे. वेग महत्त्वाचाच आहे. तसेच तो वैविध्य पद्धतीने बॉलिंग करतो. उमरानबाबतचा निर्णय हा खेळपट्टी आणि टीम मॅनेजमेंटचा निर्णय यावर अवलंबून असेल. तो आपल्या वर्ल्ड कप प्लानिंगचा भाग आहे. उमरान टीमसाठी महत्तवाचा खेळाडू आहे”, असं म्हाम्ब्रे यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान दुसऱ्या सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 1 वाजता टॉस होणार आहे. त्यामुळे टॉसनंतरच समजेल की टीममध्ये उमरानला संधी मिळाली की शार्दुलला कायम ठेवण्यात आलंय.
न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, इशान किशन, विराट कोहली, रजत पाटीदार, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक.
टीम न्यूझीलंड
टॉम लॅथम (कॅप्टन/विकेटकीपर), फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर, जेकब डफी, डग ब्रेसवेल, मार्क चॅपमन आणि हेन्री शिपली.