IND vs NZ : टॉपसह-मिडल ऑर्डर फेल, टीम इंडियाचे बॅट्समन फ्लॉप, न्यूझीलंडकडून पहिल्या सत्रात 6 झटके
India vs New Zealand 1st Test : टीम इंडियाची पहिल्या डावात दुसऱ्या दिवशी पडझड झाली. न्यूझीलंडने टीम इंडियाला पहिल्या सत्रात 6 झटके देत बॅकफुटवर टाकलं.

टीम इंडियाच्या फलंदाजांनी न्यूझीलंड विरूद्धच्या दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात घोर निराशा केली आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडला पहिल्या दिवशी 259 धावांवर ऑलआऊट केलं. त्यानंतर रोहित शर्मा झिरोवर आऊट झाला. त्यानंतर शुबमन गिल आणि यशस्वी जयस्वाल या जोडीने दुसऱ्या दिवशी 1 बाद 16 धावांपासून दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. मात्र पहिल्या सत्रात न्यूझीलंडने टीम इंडियाला झटक्यावर झटके देत बॅकफुटवर ढकललं. त्यामुळे टीम इंडिया पुन्हा एकदा अडचणीत सापडली आहे.
टीम इंडियाने पहिल्या सत्रात 91 धावांच्या मोबदल्यात 6 विकेट्स गमावले. टॉपसह मिडल ऑर्डरमधील फलंदाजांनी घोर निराशा केली. न्यूझीलंडने विकेट्स घेतल्या नाहीत तर भारतीय फलंदाजांनी विकेट्स टाकल्या. भारतीय फलंदाजांमध्ये जणू झटपट आऊट होण्याची स्पर्धाच लागली. अनुभवी विराट कोहली फुलटॉस बॉलवर क्लिन बोल्ड झाला. तर बंगळुरु कसोटीत दीडशतकी खेळी करणारा सर्फराज खान बेजबाबदारपणे शॉट मारुन आऊट झाला. तसेच ऋषभ पंतनेही तशीच चूक केली.
टीम इंडियाची घसरगुंडी
टीम इंडियाला दुसऱ्या दिवशी शुबमन गिल याच्या रुपात पहिला आणि एकूण दुसरा झटका लागला. शुबमन 30 धावांवर एलबीडल्यू आऊट झाला. विराट कोहली 1 धावेवर क्लिन बोल्ड झाला. यशस्वी जयस्वाल 30 धावांवर एलबीडब्ल्यू झाला. ऋषभ पंतने 18 धावा जोडून मैदानाबाहेरचा रस्ता धरला. सर्फराजने 11 रन्सचं योगदान दिलं. तर आर अश्विनने 4 धावा केल्या. त्यानंतर लंच ब्रेक झाला तेव्हा वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा ही जोडी नाबाद परतली. टीम इंडियाने 7 विकेट्स गमावून 107 धावा केल्या आहेत. मात्र अजूनही रोहितसेना 152 धावांनी पिछाडीवर आहे. अशात आता टीम इंडियाला कमबॅक करायचं असेल तर सुंदर आणि जडेजावर मोठी भिस्त असणार आहे. त्यामुळे या जोडीवर आता मोठी जबाबदारी असणार आहे.
तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडकडून पहिल्या सत्रापर्यंत मिचेल सँटनर याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. सँटनर याची कसोटी कारकीर्दीत 4 विकेट्स घेण्याची पहिलीच वेळ ठरली. ग्लेन फिलिप्सने दोघांना बाद केलं. तर टीम साऊथीने 1 विकेट घेतली आहे.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रवीचंद्रन अश्विन, आकाश दीप आणि जसप्रीत बुमराह
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टॉम लॅथम (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउथी, एजाज पटेल आणि विल्यम ओरुर्के.