टीम इंडियाच्या फलंदाजांनी न्यूझीलंड विरूद्धच्या दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी घोर निराशा केली. मिचेल सँटरन याच्या फिरकीसमोर भारतीय गोलंदाजांनी गुडघे टेकले. टीम इंडियाचा डाव 259 च्या प्रत्युत्तरात 159 धावांवर आटोपला आणि त्यामुळे न्यूझीलंडला 103 धावांची बहुमुल्य आघाडी मिळाली. मिचेल सँटनर याची भारतात आणि कसोटी कारकीर्दीत 5 विकेट्स घेण्याची ही पहिलीच वेळ ठरली. मिचेल सँटनर याने सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्या. भारताने दुसऱ्या दिवशी 1 बाद 16 पासून खेळाला सुरुवात केली. मात्र दुसऱ्या सत्रातच सँटनरने करेक्ट कार्यक्रम केला आणि डाव गुंडाळला. फलंदाज अपयशी ठरल्याने आता पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांवर मोठी जबाबदारी असणार आहे.
दरम्यान टीम इंडियाला दुसऱ्या दिवशी 9 विकेट्स गमावून 140 धावाच करता आल्या. वॉशिंग्टन सुंदर याच्या 7 आणि आर अश्विनच्या 3 विकेट्सच्या जोरावर टीम इंडियाने न्यूझीलंडला 259 धावांवर पहिल्या दिवशी ऑलआऊट केलं. त्यानंतर रोहित शर्मा 0वर आऊट झाला. शुबमन गिल आणि यशस्वी जयस्वालव या जोडीने 1 बाद 16 पासून दुसर्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. मात्र टीम इंडियाला 9 विकेट्सच्या मोबदल्यात 140 धावांचीच भर घालता आली. टीम इंडियाच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करुन डाव सावरता आला नाही.
यशस्वी आणि शुबमन या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली. मात्र मिचेल सँटनर याने ही जोडी फोडली. शुबमन गिल भारताच्या 50 धावा असताना एलबीडबल्यू आऊट झाला. शुबमन 30 धावा करुन माघारी परतला. इथून टीम इंडियाची पडझड सुरु झाली. न्यूझीलंडने टीम इंडियाला झटक्यावर झटके देत गुंडाळलं.शुबमननंतर विराट कोहली 1, यशस्वी जयस्वाल 30, ऋषभ पंत 18, सर्फराज खान 11, आर अश्विन 4 आणि आकाश दीप याने 6 धावा केल्या. तर जसप्रीत बुमराह झिरोवर आऊट होताच भारताचा डाव आटोपला. न्यूझीलंडकडून मिचेल सँटनर व्यतिरिक्त ग्लेन फिलिप्स याने दोघांना बाद केलं. तर टीम साऊथीने 1 विकेट घेतली.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रवीचंद्रन अश्विन, आकाश दीप आणि जसप्रीत बुमराह
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टॉम लॅथम (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउथी, एजाज पटेल आणि विल्यम ओरुर्के.