IND vs NZ : विराट शेवटच्या बॉलवर आऊट, तिसऱ्या दिवशी टीम इंडिया 125 धावांनी पिछाडीवर
India vs New Zealand 1st Test Day 3 Highlights In Marathi : टीम इंडियाने न्यूझीलंडच्या 356 धावांच्या प्रत्युत्तरात चिवट प्रतिकार करत तिसऱ्या दिवसअखेर 231 धावा केल्या. मात्र टीम इंडिया अजूनही 125 धावांनी पिछाडीवर आहे.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. टीम इंडियाने खेळ संपेपर्यंत 356 धावांच्या प्रत्युत्तरात 3 विकेट्स गमावून 49 ओव्हरमध्ये 231 धावा केल्या आहेत. विराट कोहली दिवसातील शेवटच्या बॉलवर आऊट झाला. त्यामुळे टीम इंडियाच्या दिवसाचा शेवट गोड होऊ शकला नाही. विराटने 70 धावांची खेळी केली. तर सर्फराज खान हा 70 धावांवर नाबाद परतला. तर त्याआधी कॅप्टन रोहित याने 52 आणि यशस्वी जयस्वाल याने 35 धावांची खेळी केली. त्याआधी न्यूझीलंडने पहिल्या डावात टीम इंडियाच्या 46 धावांच्या प्रत्युत्तरात 402 धावा करत 356 धावांची भक्कम आघाडी घेतली.
तिसऱ्या दिवसाचा खेळ
न्यूझीलंडच्या रचीन रवींद्र आणि डॅरेल मिचेल या जोडीने 3 बाद 180 धावांपासून तिसऱ्या दिवसाचा खेळाला सुरुवात केली. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडला झटपट 4 झटके दिले आणि सामन्यात कमबॅक केलं. त्यामुळे न्यूझीलंडची 7 बाद 233 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर टीम साऊथीने रचीन रवींद्रला चांगली साथ दिली. रचीन आणि टीमने सामन्याला कलाटणी देणारी भागीदारी केली. या दोघांनी आठव्या विकेटसाठी 137 रन्सची पार्टनरशीप केली. त्यामुळे टीम इंडिया पुन्हा बॅकफुटवर गेली. मोहम्मद सिराजने टीम साऊथीला 65 धावांवर आऊट करत ही जोडी फोडली. त्यानंतर अझाज पटेलला कुलदीप यादवने एलबीडब्ल्यू आऊट केलं. तर रचीन रवींद्र आऊट होताच न्यूझीलंडचा डाव आटोपला.
न्यूझीलंडने 91.3 ओव्हरमध्ये सर्वबाद 402 धावा केल्या आणि 356 धावांची मोठी आघाडी घेतली. न्यूझीलंडसाठी रचीन रवींद्र याने सर्वाधिक 134 धावांचं योगदान दिलं. तर डेव्हॉन कॉनव्हे याने 91 धावा केल्या. तर टीम साऊथी 65 धावा करत निर्णायक साथ दिली. टीम इंडियाकडून कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स मिळवल्या. मोहम्मद सिराजने दोघांना बाद केलं. तर आर अश्विन आणि जसप्रीत बुमराहच्या खात्यात 1-1 विकेट गेली.
टीम इंडियाचा दुसरा डाव
पहिल्या डावात 46 धावांवर सर्वबाद झाल्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या डावात अप्रतिम सुरुवात केली. कॅप्टन रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनी 72 धावांची सलामी भागीदारी केली. त्यानंतर यशस्वी मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात स्टंपिंग झाला. यशस्वीने 52 बॉलमध्ये 35रन्स केल्या. रोहित शर्माही काही ओव्हरनंतर आऊट झाला. रोहितला चांगली सुरुवात मिळाली होती. त्याच्याकडून मोठ्या खेळीची आशा होती. मात्र रोहित दुर्देवी ठरला. रोहित बोल्ड झाला. रोहितने 63 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 8 फोरसह 52 रन्स केल्या. त्यामुळे टीम इंडियाची 95 बाद 2 अशी स्थिती झाली.
विराट-सर्फराजची जबरदस्त भागीदारी
यशस्वी-रोहित आऊट झाल्यानंतर विराट आणि सर्फराज खान या जोडीने अप्रतिम भागीदारी केली. या दोघांनी मैदानात चौफेर फटकेबाजी करत कसोटी सामन्यात वनडे स्टाईल बॅटिंग केली. या दोघांच्या वेगवान बॅटिंगमुळे टीम इंडियाला 200 पार मजल मारता आली. या दोघांनी अर्धशतकी खेळी केल्यानंतर आणखी वेगात धावा करण्याचा प्रयत्न केला. ही जोडी सेट झाल्याने न्यूझीलंडची डोकेदुखी वाढत चाललेली. मात्र अखेरच्याच चेंडूवर गडबड झाली.
विराट 49 व्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर कॅच आऊट झाला. विराटने या निर्णयाला आव्हान देत रीव्हीव्यू घेतला. मात्र विराट आऊट असल्याचंच स्पष्ट झालं. विराट आऊट झाल्याने टीम इंडियाने तिसरी विकेट गमावली. विराटने 102 बॉलमध्ये 8 फोर आणि 1 सिक्ससह 70 धावा केल्या. विराट आऊट होताच तिसऱ्या दिवसाचा खेळही संपला. सर्फराज आणि विराट या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 136 धावांची भागीदारी केली. तर सर्फराज खान 78 बॉलमध्ये 7 फोर आणि 3 सिक्ससह 70 रन्सवर नॉट आऊट परतला. न्यूझीलंडकडून अझाज पटेल याने 2 विकेट्स घेतल्या. तर ग्लेन फिलिप्स याने शेवटच्या बॉलवर विराटला कॅच आऊट करत टीम इंडियाला जाता जाता मोठा झटका दिला.
टीम इंडिया अद्याप 125 धावांनी पिछाडीवर
Stumps on Day 3 in the 1st #INDvNZ Test!
End of a gripping day of Test Cricket 👏👏#TeamIndia move to 231/3 in the 2nd innings, trail by 125 runs.
Scorecard – https://t.co/FS97LlvDjY@IDFCFIRSTBank pic.twitter.com/LgriSv3GkY
— BCCI (@BCCI) October 18, 2024
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टॉम लॅथम (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचीन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, टीम साउथी, एजाझ पटेल आणि विल्यम ओरूर्के.