IND vs NZ 3rd ODI – टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्धची वनडे सीरीज आधीच जिंकली आहे. मालिकेत टीम इंडियाकडे 2-0 अशी विजयी आघाडी आहे. दुसरा वनडे सामना सहज जिंकून टीम इंडियाने मालिका अलगद खिशात घातली. वनडे सीरीजनंतर टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्धच टी 20 मालिका खेळणार आहे. न्यूझीलंड सीरीजनंतर टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलिया सीरीजच मुख्य आव्हान आहे. फेब्रुवारीपासून भारत-ऑस्ट्रेलियामध्ये चार कसोटी सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. रोहित शर्माने या सीरीजसाठी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. सध्या मोहम्मह शमी आणि मोहम्मद सिराज फुल फॉर्ममध्ये आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या दोन्ही वनडेमध्ये सिराजने जबरदस्त बॉलिंग केली. शमीने दुसऱ्या वनडेत तीन विकेट काढून फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले आहेत.
का नाही खेळवणार? कोणाला संधी देणार?
हे दोन्ही बॉलर्स ऐन भरात असूनही रोहितने न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या वनडेत त्यांना फक्त 12 ओव्हर्ससाठी बॉलिंग दिली. रोहितने नंतर त्यामागच कारणही सांगितलं. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट सीरीज जवळ येतेय. या दोन्ही बॉलर्सना ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सीरीजसाठी फ्रेश ठेवायच आहे. न्यूझीलंड विरुद्ध इंदोर येथे होणारा तिसरा वनडे सामना आता फक्त औपचारिकता मात्र आहे. त्यामुळे या दोघांपैकी एकाला किंवा दोघांनाही रोहित शर्मा विश्रांती देण्याचा निर्णय घेऊ शकतो. त्यांच्याजागी उमरान मलिकला तिसऱ्या वनडेमध्ये संधी मिळू शकते. श्रीलंकेविरुद्धच्या T20 आणि वनडे सीरीजमध्ये उमरान मलिकने आपल्या बॉलिंगची दाहकता दाखून दिलीय.
रोहित शर्मा काय म्हणाला?
“मागच्या पाच सामन्यात तुम्ही पाहिलं असेल, बॉलर्सनी त्यांची कामगिरी उंचावली आहे. आम्ही त्यांच्याकडून जी अपेक्षा केली, त्या त्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय. भारतात तुम्हाला अशा प्रकारची गोलंदाजी पहायला मिळत नाही. परदेशात अशी गोलंदाजी दिसून येते. या बॉलर्सकडे कौशल्य आहे. त्यांनी खूप मेहनत केलीय. त्यांना यश मिळताना पाहून आनंद होतोय. शमी आणि सिराज मोठे स्पेल टाकू शकतात. पण टेस्ट सीरीज येत असल्याची मी त्यांना आठवण करुन दिली. त्यामुळे त्यांची काळजी घेण्याची गरज आहे” असं रोहित शर्मा सामना संपल्यानंतर म्हणाला.
कुठले गोलंदाज दुखापतीने त्रस्त?
भारताचे अनेक वेगवान गोलंदाज सध्या दुखापतीने त्रस्त आहेत. जसप्रीत बुमराह, दीपक चाहर, टी नटराजन आणि प्रसिद्ध कृष्णा दुखापतग्रस्त आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यात मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज भारताच्या वेगवान गोलंदाजीची धुरा वाहतील.