India vs New Zealand T20 Series : टीम इंडियाने काल न्यूझीलंड विरुद्ध तिसरा टी 20 सामना जिंकला. सामन्यासह टीम इंडियाने 2-1 अशी सीरीज जिंकली. टीम इंडियाच्या विजयात ओपनर शुभमन गिलने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 63 चेंडूत नाबाद 126 धावा फटकावल्या. आपल्या शतकी खेळीत शुभमनने 12 फोर आणि 7 सिक्स मारले. शतकी खेळी करताना मी काही वेगळं केलं नाही. मी माझा नैसर्गिक खेळ खेळलो. शुभमनने काल आक्रमक बॅटिंगचा नजराणा पेश केला. आपली इनिंग खेळल्यानंतर शुभमनने कॅप्टन हार्दिकबद्दल मोठं विधान केलं. टीम इंडियाने या मॅचमध्ये 234 धावांचा डोंगर उभारला. न्यूझीलंडची टीम 66 रन्सवर ऑलआऊट झाली. टीम इंडियाने 168 धावांनी टी 20 मधील मोठा विजय मिळवला.
शुभमन गिलच विधान
“जेव्हा तुम्हाला तुमच्या सरावाच फळ मिळतं, तेव्हा खूप चांगलं वाटतं. टीमसाठी चांगली इनिंग खेळून मी आनंदी आहे. सिक्स मारण्याची प्रत्येकाची आपल टेक्निक असते” असं शुभमन म्हणाला. त्याने हार्दिक पंड्याला सेंच्युरीच क्रेडीट दिलं. “हार्दिक भाईने मला माझा नैसर्गिक खेळ खेळण्याचा सल्ला दिला. मला काहीही अतिरिक्त करण्याची आवश्यकता नाही” असं त्याने सांगितलं.
तिन्ही फॉर्मेटमध्ये शतक ठोकणारा कितवा भारतीय?
शुभमन गिल तिन्ही फॉर्मेटमध्ये शतक ठोकणारा भारताचा पाचवा बॅट्समन आहे. त्याच्याआधी सुरेश रैना, रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहलीने अशी कामगिरी केलीय.
शुभमनने विराटचा रेकॉर्ड मोडला
गिलने फक्त 63 चेंडूत 126 धावा चोपल्या. T20 मध्ये भारतासाठी हा सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड आहे. गिलच्या आधी विराट कोहलीने अफगाणिस्तान विरुद्ध नाबाद 122 धावांची शतकी खेळी केली होती. 8 सप्टेंबर 2022 रोजी अफगाणिस्तान विरुद्ध विराटने ही कामगिरी केली होती. शुभमनने 5 महिन्यात हा रेकॉर्ड मोडला.
हार्दिक काय म्हणाला?
मैदानावर निर्णय घेताना मी माझ्या मनाच ऐकतो असं हार्दिकने सांगितलं. “मी नेहमी अशाच पद्धतीने खेळत आलोय. स्थिती समजून परिस्थितीच्या गरजेनुसार निर्णय घेतो” असं हार्दिक पंड्या म्हणाला. न्यूझीलंडचा कॅप्टन मिचेल सँटनर पराभवाने निराश दिसला. भारताला विजयाच श्रेय देताना, उत्कृष्ट क्रिकेट खेळल्याबद्दल कौतुक केलं.