IND vs NZ : एक नंबर, एव्हरेज की चिंताजनक? टीम इंडियाची वानखेडे स्टेडियममधील कामगिरी कशी? पाहा आकडेवारी
India vs New Zealand 3rd Test Wankhede Stadium : न्यूझीलंड टीम इंडिया विरूद्धच्या कसोटी मालिकेत 2-0 अशा एकतर्फी फरकाने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणारा तिसरा आणि अंतिम सामना हा प्रतिष्ठेचा आहे.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना हा 1 नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाने 2012 नंतर पहिल्यांदाच मायदेशात कसोटी मालिका गमावली आहे. न्यूझीलंडने 3 सामन्यांच्या या मालिकेतील पहिले 2 सामने जिंकले. न्यूझीलंडने आधी बंगळुरु त्यानंतर पुण्यात सामना जिंकून इतिहास रचला. न्यूझीलंडने भारताला भारतात लोळवत पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. त्यानंतर आता आणखी एक विक्रम 12 वर्षांनंतर उद्धवस्त होऊ शकतो. अशात टीम इंडिया या सामन्यात विजयाच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे.
टीम इंडियावर मालिका गमावल्यानंतर आता व्हाईटवॉशची टांगती तलवार आहे. भारताला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अद्याप कोणतीही टीम मायदेशात 3 किवा त्यापेक्षा अधिक सामन्यांच्या मालिकेत व्हाईटवॉशने पराभूत करु शकलेली नाही. मात्र आता न्यूझीलंडकडे टीम इंडियाचा 3-0 ने धुव्वा उडवण्याची संधी आहे. दक्षिण आफ्रिकेने भारताला 2-0 ने कसोटी मालिकेत पराभूत केलं होतं. त्यामुळे भारताला मायदेशातील 12 वर्षांआधीचा विक्रम अबाधित ठेवायचा असेल तर अतिंम कसोटीत विजय मिळवावाच लागेल. त्यानिमित्ताने टीम इंडियाची मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये कामगिरी कशी राहिली आहे? हे जाणून घेऊयात.
भारताची वानखेडेतील कामगिरी
टीम इंडियाची वानखेडे स्टेडियममधील आकडेवारी वाईट नाही पण फारशी चांगलीही नाही. टीम इंडियाने 1975 पासून ते आतापर्यंत एकूण 26 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी 12 सामन्यातच भारताला विजयी होता आलं आहे. टीम इंडियाने 7 गमावलेत तर तितकेच सामने हे बरोबरीत सोडवले आहेत. भारताला वानखेडेत गेल्या 5 पैकी एकाच सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. इंग्लंडने 2012 साली भारताला वानखेडे लोळवलं होतं. तेव्हापासून गेल्या 12 वर्षांपासून टीम इंडिया अजिंक्य आहे.
तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि वॉशिंग्टन सुंदर.
तिसऱ्या सामन्यासाठी न्यूझीलंड टीम : टॉम लॅथम (कॅप्टन), टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मार्क चॅपमॅन, डेव्हॉन कॉनव्हे, मॅट हेनरी, डॅरल मिचेल, विल ओ रुर्के, एझाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचीन रवींद्र, मिचेल सँटनर, जेकब डफी, इश सोढी, टीम साउथी, केन विलियमसन आणि विल यंग.