IND vs NZ : रवींद्र जडेजाचा न्यूझीलंडविरुद्ध ‘पंजा’, वानखेडेत दिग्गजांना पछाडलं
Ravindra Jadeja Fifer India vs New Zealand 3rd Test : रवींद्र जडेजाने वानखेडे स्टेडियममध्ये 5 विकेट्स घेत न्यूझीलंडला ऑलआऊट करण्यात निर्णायक भूमिका बजावली. जडेजाने यासह पाकिस्तानच्या शोएब अख्तरचा रेकॉर्ड उद्धवस्त केला आहे.
टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध मायदेशातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 0-2 ने पिछाडीवर आहे. तर तिसरा आणि अंतिम सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. भारतीय गोलंदांजी या तिसर्या सामन्यातील पहिल्या डावात अप्रतिम गोलंदाजी केली. आकाश दीप, वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा या तिघांनी न्यूझीलंडला 250 धावांच्या आत रोखण्यात यश मिळवलं. न्यूझीलंडचा पहिला डाव हा 65.4 ओव्हरमध्ये 235 रन्सवर आटोपला. न्यूझीलंडला गुंडाळण्यात रवींद्र जडेजाने सर्वात जास्त योगदान दिलं. तर सुंदर आणि आकाश दीपनेही चांगली साथ दिली.
रवींद्र जडेजाने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. जडेजाने या 5 पैकी 4 विकेट्स या 2 ओव्हरमध्येच घेतल्या. जडजाने 2 षटकांमध्ये प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. जडेजाने विल यंग, टॉम ब्लंडेल, ग्लेन फिलिप्स, इश सोढी आणि मॅट हॅन्री या 5 जणांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. जडेजाने मॅट हॅन्रीला आऊट करत वानखेडेत मोठा रेकॉर्ड ब्रेक केला.
जडेजाची कसोटी क्रिकेटमधील एका डावात 5 विकेट्स घेण्याची ही 14 वी वेळ ठरली. जडेजाने 77 व्या सामन्यात ही कामगिरी केलीय. जडेजाने यासह भारताचे माजी दिग्गज बिशनसिंह बेदी यांच्या 14 वेळा 5 विकेट्स घेण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. तर फझल महमूद, अँगस फ्रेझर, व्हर्नन फिलँडर, ख्रिस केर्न्स, मायकल होल्डींग, अँडी कॅडिक आणि साकेलन मुस्ताक यांना मागे टाकलं आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात 12 वेळा 5 विकेट्स
दरम्यान शोएब अख्तरसह अनेक गोलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात 12 वेळा 5 विकेट्स घेतल्या होत्या. यामध्ये अख्तरसह, फीडल एडवर्ड्स, स्टूअर्ट मॅकगिल, सुभाष गुप्ते, मॉन्टी पानेसर, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि चामिंडा वास यांना ही कामगिरी केली आहे.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रवीचंद्रन अश्विन, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनव्हे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, इश सोधी, मॅट हेन्री, एजाज पटेल आणि विल्यम ओरुर्के.