IND vs NZ : अरे रे..! रोहितसह विराट कोहलीचा फुसका बार, न्यूझीलंडकडून दिवाळीचं नकोसं गिफ्ट
भारताने न्यूझीलंडविरुद्धची तीन सामन्यांची कसोटी मालिका आधीच गमावली होती. पण तिसरा सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा होता. पण भारताने या सामन्यातही फार काही ग्रेट केलं नाही. फलंदाजांकडून अपेक्षाभंग झाल्याचं पाहायला मिळालं.
न्यूझीलंडने तिसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. खेळपट्टीचा अंदाज असल्याने न्यूझीलंडने बरोबर डाव टाकला होता. पहिल्या दिवशी न्यूझीलंडचा संपूर्ण संघ अवघ्या 235 धावांवर बाद झाला. त्यामुळे टीम हा सामना जिंकेल अशा आशा वाढल्या होत्या. पहिल्या डावात मोठ्या आघाडीची अपेक्षा टीम इंडियाकडून होती. पण गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला कित्ता पुन्हा एकदा गिरवला गेला. भारताने पहिल्या डावात 263 धावा केल्या आणि 28 धावांची आघाडी घेतली. त्यामुळे भारताची दुसऱ्या डावात काही खरं नाही हे स्पष्ट होतं. न्यूझीलंडने दुसऱ्या डावात 174 धावा केल्या. यातून 28 धावा वगळता 146 धावांचं सोपं आव्हान देण्यात आलं होतं. पण टीम इंडियाची फलंदाजी पाहून क्रीडाप्रेमींनी डोक्यावर हात मारून घेतला. विजयासाठी दिलेल्या 146 धावाही भारताला करता आल्या नाही. भारताचा संपूर्ण डाव 121 धावांवर आटोपला आणि 25 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं.
रोहित शर्माने विकेट देण्याचा शुभारंभ केला. संघाच्या अवघ्या 13 धावा असताना वैयक्तिक 11 धावांवर बाद झाला. त्यानंतर शुबमन गिल आणि मोक्याच्या क्षणी अवघी 1 धाव करून तंबूत परतला. त्यामुळे टीम इंडियावर दबाव वाढत गेला. विराट कोहलीला दिग्गज अनुभवी फलंदाज म्हणून वारंवार संधी दिली जात आहे. पण यावेळीही त्याचा फुसका बार निघाला. अवघी 1 धाव करून एजाज पटेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. सरफराज खानला फर्स्ट क्लास क्रिकेटमधील कामगिरीच्या जोरावर संधी मिळाली होती. पण पुण्यात 150 धावा वगळता न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत फेल गेला आहे. त्याला फक्त एक धाव करता आली. रवींद्र जडेजाही फुसका बार निघाला. त्याला 22 चेंडूत फक्त 6 धावा करता आल्या.
एखाद दुसरा फलंदाज चांगली कामगिरी करतो आणि बाकीचे खेळाडू एकेरी धावसंख्येवर तंबूत परतात. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत फार काही ग्रेट करता आलंच नाही. अनुभवी दिग्गज फलंदाजांची फलंदाजी पाहून क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला. देशात खेळताना इतकी त्रेधातिरपीट उडाली असताना ऑस्ट्रेलियात काय करतील याचा अंदाज क्रीडाप्रेमी आतापासूनच बांधून बसले आहे.