Virat Kohli Vs Kane Williamson दोघांमध्ये सर्वोत्तम कोण? आकडे कुणाच्या बाजूने?
विराट कोहली आणि केन विल्यमसन (Virat Kohli Vs Kane Williamson) दोघांचेही कसोटी क्रिकेटमधील आकडे काही प्रमाणात सारखेच आहेत.
मुंबई : इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने (Michael Vaughan) नुकत्याच एका नवीन वादाला तोंड फोडले आहे. त्याने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनची (Kane Williamson) तुलना केली आहे. विल्यमसन हा कोहलीपेक्षा चांगला फलंदाज आहे आणि पुढच्या महिन्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात (ICC World Test Championship Final 2021) तो कोहलीपेक्षा अधिक धावा करेल, असा दावा त्याने केला आहे. वॉन म्हणाला की, भारतीय चाहत्यांमुळे कोहलीची प्रशंसा अधिक केली जाते. वॉनच्या या वक्तव्यामुळे क्रिकेटविश्वात मोठ्या वादाला सुरुवात झाली आहे. परंतु कोहली आणि विल्यमसन यांची कामगिरी आणि आकडेवारी एक वेगळीच कथा दर्शवते, कारण, अनेक बाबतीत विराट हा विल्यमसनपेक्षा उजवा आहे.
विराट आणि विल्यमसन (Virat Kohli Vs Kane Williamson) दोघांचेही कसोटी क्रिकेटमधील आकडे सारखेच आहेत. कोहलीने 91 कसोटी सामन्यांमध्ये 52.37 च्या सरासरीने 7490 धावा केल्या आहेत. त्यात त्याने 27 शतकं आणि 25 अर्धशतकं फटकावली आहेत. तर न्यूझीलंडच्या कर्णधाराने 83 कसोटी सामन्यांमध्ये 24 शतकं आणि 32 अर्धशतकांसह 54.31 च्या सरासरीने 7115 धावा फटकावल्या आहेत. दोघांची ही आकडेवारी जवळपास सारखीच आहे. परंतु याच आकडेवारीचा डिटेल विचार केला तर लक्षात येईल की, विराट कोहली विल्यमसनपेक्षा उत्तम आहे. (IND vs NZ | Who is Best in Virat Kohli Vs Kane Williamson, Test Stats)
SENA देशांविरोधात विराटचं पारडं जड
SENA देश म्हणजेच दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघाविरोधात खेळणं प्रत्येक देशासाठी/खेळाडूसाठी कठीण असतं. या देशांमध्ये न्यूझीलंड वगळता उर्वरित तिन्ही देशांविरोधात कोहलीची कामगिरी सरस राहिली आहे. SENA देशांमध्ये कोहलीने आतापर्यंत 32 कसोटी सामन्यांमध्ये 46.59 च्या सरासरीने 2889 धावा केल्या आहेत. यात त्याने 11 शतकेही लगावली आहेत. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत त्याची सरासरी 50 पेक्षा जास्त आहे.
अव्वल संघांसमोर विल्यमसनची बॅट शांत
केन विल्यमसनची आकडेवारी पाहता लक्षात येईल की, अव्वल संघांसमोर खेळताना त्याला संघर्ष करावा लागतो. भारतात खेळवण्यात आलेल्या सात कसोटी सामन्यांमध्ये त्याने केवळ 461 धावा केल्या आहेत. तसेच इंग्लंडमध्ये चार कसोटीत त्याने 247 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी येथे 30.87 इतकी आहे. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेतही त्याला सात डावांमध्ये 127 धावा करता आल्या आहेत. भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडसारख्या देशांमध्ये त्याने 22 कसोटी सामन्यात 34.8 च्या सरासरीने 1392 धावा जमवल्या आहेत.
विल्यमसन विजयी सामन्यांमधला वाघ
न्यूझीलंडच्या विजयांमध्ये विल्यमसनचं योगदान मोठं आहे. केन विल्यमसनने न्यूझीलंडने जिंकलेल्या 36 सामन्यांमध्ये 78.29 च्या सरासरीने 3993 धावा फटकावल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये जिंकलेल्या सामन्यांमध्ये त्याची सरासरी डॉन ब्रॅडमन आणि स्टीव्ह स्मिथनंतर सर्वाधिक आहे. जिंकलेल्या कसोटींच्या बाबतीत कोहली विल्यमसनच्या मागे आहे. त्याने फटकावलेल्या 27 पैकी 13 शतके भारताच्या विजयात महत्त्वाची ठरली आहेत. या बाबतीत त्याची सरासरी 58.25 इतकी आहे. कसोटी सामन्याच्या दुसर्या डावात फलंदाजी करताना विल्यमसनने भारतीय कर्णधाराला मागे टाकले. त्याने कसोटी क्रिकेटच्या दुसर्या डावात 48 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तर कोहलीने 40.69 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
बलाढ्य संघांविरोधात कोहली अव्वल
परंतु आकडेवारीवरून असे दिसून येते की, भारतीय कर्णधाराने जगातील बलाढ्य आणि सर्वोत्तम संघांविरोधात खोऱ्याने धावा केल्या आहेत. तर अशा संघांसमोर विल्यमसनला अडचणींचा सामना करावा लागतो. त्याचे बहुतांश विक्रम दुर्बल संघांविरोधात आहेत. तर इंग्लंडमधील खेळपट्यांवरील कामगिरीचा विचार केला तर इथेही विराट कोहली विल्यमसनपेक्षा उजवा आहे.
टीम इंडियाचा इंग्लंड दौरा
जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनल
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड, 18 ते 23 जून, साउथ्मपटन
इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक
- पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट
- दुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट
- तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट
- चौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर
- पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.
अशी आहे टीम इंडिया :
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव,
संबंधित बातम्या :
(IND vs NZ | Who is Best in Virat Kohli Vs Kane Williamson, Test Stats)