नवी दिल्ली : आशिया चषक स्पर्धेत (Asia Cup) भारत आणि पाकिस्तान (Ind vs PAK) यांच्या क्रिकेट संघांमध्ये 28 ऑगस्टला सामना रंगणार आहे. या सामन्याची सर्व चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. या सामन्याच्या तिकिटांची (Tickets) विक्रीही 15 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. खलीज टाईम्सच्या वृत्तानुसार सोमवारी भारत आणि पाकिस्तानच्या या सामन्याची तिकिटे अवघ्या तीन तासांत विकली गेली. परंतु काही लोक या सामन्याची तिकिटे पुन्हा विकताना दिसले. Dubizzle या वेबसाइटवर पाहिल्यावर ‘हॉस्पिटॅलिटी लाउंज एक्सपिरियन्स’च्या तिकिटांची किंमत 5,500 आहे, तर त्याची मूळ किंमत 2,500 आहे. सामान्य प्रवेश तिकीटाची किंमत 250 असली तरी वेबसाइट त्याची किंमत 700 असल्याचे सांगत आहे. यामध्ये अनेकांना एकदा विक्री झालेल्या तिकीटांची पुन्हा विक्री करण्याचा प्रयत्न केल्याचंही समोर आलंय. यामुळे तिकिट विक्रीत भ्रष्टाचार तर होत नाही ना, हा देखील प्रश्न सध्या चर्चेत आला आहे. यामुळे संशायचे ढग देखील गडद झाले आहेत.
आशिया चषक तिकिट भागीदार प्लॅटनियमनं म्हटलं आहे की, पुनर्विक्री झालेली तिकिटे आपोआप रद्द केली जातील. या प्लॅटफॉर्मनं आपल्या वेबसाइटवर ही माहिती दिली आणि तिकिटांची पुनर्विक्री बेकायदेशीर असल्याचंही सांगितलं आहे. कंपनीनं आपल्या वेबसाइटवर लिहिले आहे की, “ग्राहकांना प्लॅटनियम तिकीट विकत न घेण्याचा सल्ला दिला जातो, ज्या दुय्यम तिकीट वेबसाइटवर या तिकीटांची पुनर्विक्री करत आहेत कारण ही तिकिटे वैध नसण्याची किंवा प्रवेश रद्द होण्याची शक्यता असते. केले जावे.”
या प्लॅटफॉर्मने नमूद केले आहे की सामन्याच्या दिवशी तिकीट दाखवताना ग्राहकांना आयडी प्रूफ देखील दाखवावा लागेल. वापरकर्त्यांनी सांगितले की, तिकीट बुक करताना त्यांना त्यांचे पूर्ण नाव पुराव्यासह नमूद करावे लागेल. कंपनीने म्हटले आहे की, “एखाद्या ग्राहकाने एकाच सामन्यासाठी एकापेक्षा जास्त तिकिटे खरेदी केली तर त्यांना एकाच वेळी प्रवेश घ्यावा लागेल.”
सोमवारी एका ग्राहकाने प्लॅटनियम लिस्टच्या ट्विटर पेजवर ट्विट केले की त्याच्याकडे चार तिकिटे आहेत आणि ती मूळ किंमतीपेक्षा थोडी अधिक किमतीत विकायची आहेत. कंपनीने लगेच प्रतिसाद दिला आणि लिहिले, “तिकीटांची पुनर्विक्री करण्यास सक्त मनाई आहे.” प्रवेशाच्या वेळी ही तिकिटे वैध राहणार नाहीत, असेही लिहिले.
भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटे घेण्यासाठी यूएईमधील ग्राहकांनी जवळपास तीन तास वाट पाहिली पण त्यांची प्रतीक्षा वाया गेली. आयोजक तिकिटांची नवीन बॅच काही दिवसांत प्रसिद्ध करतील. भारत आणि पाकिस्तानचे संघ केवळ आशिया चषक किंवा आयसीसीच्या स्पर्धेत आमनेसामने आहेत आणि म्हणूनच या सामन्याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे.