IND vs PAK : भारत जिंकला मात्र जल्लोष अफगाणिस्तानात, हार्दिक पांड्यावर चाहते फिदा, पाहा व्हिडीओ
आशिया चषकाच्या सामन्यात हार्दिक पांड्याने दमदार खेळी खेळली. शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर एक चौकार आणि एक षटकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला. यावरुन एक व्हिडीओ व्हायरल होतोय.
नवी दिल्ली : आशिया चषक (Asia Cup 2022) स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने शानदार सुरुवात केली आहे. टीम इंडियानं पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केला. अपेक्षेप्रमाणे हा सामना अतिशय रोमांचक होता आणि शेवटच्या षटकापर्यंत गेला. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. पंड्याने ज्या पद्धतीनं भारताला (India) संकटातून बाहेर काढले आणि संघाला विजयापर्यंत नेले त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. भारतात पंड्याच्या कामगिरीचे लाखो चाहते आहेत, पण आणखी एक देश आहे जिथे पांड्याला भरभरून प्रेम मिळत आहे. ते म्हणजे अफगाणिस्तान. पाकिस्तानच्या पराभवाचा जल्लोष भारतातही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पण अफगाणिस्तानही मागे राहिला नाही. अफगाणिस्तानातही पाकिस्तानच्या पराभवाचा आनंद साजरा केला. अफगाणिस्तानमधील एका क्रिकेट चाहत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो भारताच्या विजयाचा आनंद साजरा करताना दिसत आहे.
हा व्हिडीओ पाहा
Afghani celebrating India’s victory pic.twitter.com/pWTR9vA8G2
— Out Of Context Cricket (@GemsOfCricket) August 29, 2022
पंड्याचं चुंबन घेतलं
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, काही लोक एका खोलीत बसून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहत आहेत आणि शेवटच्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर पांड्याने षटकार मारताच एक मुलगा उठला आणि त्याच्याकडे गेला. पंड्या टीव्हीवर दिसताच त्याचं चुंबन त्या मुलानं घेतलं. पाकिस्तानविरुद्ध पांड्यानं नाबाद 33 धावांची खेळी खेळली. आपल्या खेळीत या फलंदाजाने चार चौकार आणि एक षटकार लगावला. फलंदाजीपूर्वी पांड्याने चेंडूवरही अप्रतिम खेळ दाखवला आणि तीन महत्त्वाचे बळी घेतले. पांड्यानं चार षटकांत 25 धावा देत तीन बळी घेतले.
हा व्हिडीओ पाहा
The level of confident …#pathukalaam #hardikpandiya #AsiaCup2022 #INDvsPAK pic.twitter.com/PBFFCJnOfY
— IndiaGlitz – Tamil (@igtamil) August 28, 2022
पंड्या आत्मविश्वासू
शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी सात धावांची गरज होती. मोहम्मद नवाजने पहिल्याच चेंडूवर रवींद्र जडेजाला बाद करून सामन्यात रोमांच आणला. त्याच्या पाठोपाठ आलेल्या दिनेश कार्तिकने एक धाव घेत पंड्याला स्ट्राईक दिली. पंड्या पुढचा चेंडू रिकामा खेळला. इथे कार्तिकने त्याला काहीतरी सांगितले आणि पांड्याने मान हलवून जी प्रतिक्रिया दिली त्यावरून तो किती आत्मविश्वासू होता हे दिसून येते.”
सामनावीर
पंड्याला त्याच्या उत्कृष्ट अष्टपैलू खेळाच्या जोरावर सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले. आयपीएलनंतर हा खेळाडू वेगळ्या अंदाजात दिसत आहे. पांड्या पूर्वीपेक्षा चांगला गोलंदाज बनला असून त्याच्या खेळात परिपक्वता दिसून येत आहे.