IND vs PAK : पाकिस्तानच्या पराभवाचं कारण 4, 8 आणि 17 मध्ये लपलंय, कसं काय ते समजून घ्या
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील हायव्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानला 6 धावांनी पराभूत केलं. अवघ्या 119 धावांचं आव्हान हातात विकेट असूनही गाठता आलं नाही. पराभवाचं विश्लेषण करताना 4, 8 आणि 17 हे समोर आले आहेत. या तीन अंकांमध्ये नेमकं असं दडलंय आणि भारताला कसा फायदा झाला ते जाणून घेऊयात
भारताने पाकिस्तानच्या घशातून विजयाचा घास हिरावून घेतला. नाणेफेकीपासून हा सामना पाकिस्तानच्या पारड्यात झुकला होता. मात्र जेव्हा या पराभवाचं विश्लेषण केलं गेलं तेव्हा त्याचं थेट कनेक्शन 4, 8 आणि 17 या अंकाशी जुळून आलं आहे. हे काही अंकशास्त्राचं गणित आहे. याचा थेट संबंध पाकिस्तानच्या खराब कामगिरीशी निगडीत आहे. या अंकांवर घडलेल्या घडामोडींमुळेच पाकिस्तानला पराभव सहन करावा लागला. नेमकं या अंकांचं काय योगदान आहे आणि भारताला 6 धावांनी कसा विजय मिळाला ते समजून घेऊयात. भारताचा डाव सुरु झाल्यानंतर पहिल्या तीन षटकात पाकिस्तानकडून मोठ्या घोडचुका झाल्या. भारतीय डावातील तिसऱ्या षटकापासून नवव्या षटकापर्यंत या घडामोडी घडल्या. पाकिस्तानने एकच चूक वारंवार केली आणि त्याचा फटका त्यांना सरतेशेवटी बसला. पाकिस्तानने चुका केल्या तो खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून ऋषभ पंत आहे. त्याला वारंवार मिळालेल्या जीवदानामुळे भारताला फायदा झाला.
ऋषभ पंतने 31 चेंडूत 42 धावा केल्या. यावेळी त्याला तीन वेळा जीवदान मिळालं. अगदी हातातले सोपे झेल यावेळी पाकिस्तानने सोडले. 4, 8 आणि 17 हे ऋषभ पंतच्या खेळीतील धावसंख्या आहे. या टप्प्यावर पाकिस्तानने चुका केल्या आणि त्याचा भुर्दंड पराभवातून भरावा लागला. ऋषभ पंतच्या खेळीमुळे भारताला 119 ही धावसंख्या गाठता आली. धीम्या खेळपट्टीवर पाकिस्तानची भंबेरी उडाली आणि भारताला सहज विजय मिळाला.
ऋषभ पंतचा पहिला झेल पाकिस्तानने सहाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सोडला. मोहम्मद आमिरच्या गोलंदाजीवर पंतचा झेल इफ्तिखार अहमदने सोडला. तेव्हा ऋषभ पंत 4 या धावसंख्येवर होता. झेल तर सुटलाच वरून चार धावाही मिळाल्या. त्यानंतर याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ऋषभ पंतचा आणखी एक झेल सोडला. तेव्हा पंत 8 या धावसंख्येवर होता. त्यानंतर नवव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ऋषभ पंतला पुन्हा एकदा जीवदान मिळालं. इमाद वसीमच्या षटकात उस्मान खानने हा झेल सोडला. ऋषभ पंत तेव्हा 17 या धावसंख्येवर होता.
ऋषभ पंतने इतकंच काय तर रोहित शर्माला डीआरएस घेण्यातही मदत केली. त्याचा फायदा टीमला झाला. तसेच विकेट पाठी तीन झेल पकडले. एक झेल तर हेल्मेटला पाय न लागता पकडण्याची कसब दाखवली. त्यामुळे 5 धावांची पेनल्टी वाचली. त्यामुळे या सामन्यात ऋषभ पंत गेम चेंजर ठरला.