Ind vs Pak T20 Asia Cup : खेळात काळं का? पाकिस्तानचा संघ भारताविरुद्ध काळी पट्टी बांधून मैदानात उतरणार, यामागचं कारण जाणून घ्या…
Ind vs Pak T20 Asia Cup : पाक आशिया चषक-2022 च्या पहिल्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी भारताशी भिडणार आहे. या सामन्यापूर्वी त्यांच्या खेळाडूंनी एक निर्णय घेतला आहे. अधिक वाचा...
नवी दिल्ली : आज क्रिकेटप्रेमींचं लक्ष भारत -पाकिस्तानच्या (Ind vs Pak) सामन्याकडे लागलं आहे. कधी हा सामना सुरू होतो आणि मैदानातील फटकेबाजी कधी दिसून येते, असं क्रिकेटप्रेमींना झालं आहे. पाकिस्तान क्रिकेट संघ आज आशिया चषकच्या (Ind Vs Pak Asia Cup 2022) त्यांच्या पहिल्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भारताविरुद्ध (India) खेळणार आहे. जगाच्या नजरा या सामन्याकडे लागल्या आहेत. संपूर्ण क्रिकेट विश्वात या सामन्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान संघानं हा निर्णय घेतला आहे. या सामन्यात पाकिस्तानचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात उतरतील. खेळाडू अनेकदा काळ्या पट्टीनं खेळतात. यावेळीही तसेच आहे. आपल्या देशातील पुरामुळे बाधित झालेल्या लोकांशी एकता दाखवण्यासाठी पाकिस्तानच्या खेळाडूंनी हा निर्णय घेतला आहे. एका पाकिस्तानी पत्रकाराने ट्विट करून याबाबत माहिती दिली.
पुराचा कहर
पाकिस्तानमध्ये सध्या पुराचा कहर सुरूच आहे. या कहरात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तर अनेकांना घरे गमवावी लागली आहेत. पाकिस्तानमध्ये खैबर पख्तून, बलुचिस्तान, सिंध प्रांतात पुराने कहर केला आहे. या पुरामुळे बलुचिस्तानचा देशाच्या इतर भागांशी संपर्क तुटला आहे.
हे ट्विट पाहा
#Breaking: Pakistan cricket team will wear black arm bands in their first match of #AsiaCup vs India today to express their solidarity & support for the flood affectees across the Pakistan.#IndvPak
— Sawera Pasha (@sawerapasha) August 28, 2022
24 तासांत 119 जणांना मृत्यू
पाकिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत या पुरात 119 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. शनिवारी बलुचिस्तानमधील चार, गिलकिट बाल्टिस्तानमधील सहा, खैबर पख्तूनमधील 31 आणि सिंध प्रांतातील 76 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या पुरामुळे 110 जिल्हे प्रभावित झाले आहेत. 72 जिल्हे दुर्घटनाग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या पुरामुळे पाकिस्तानात 33 दशलक्ष लोक प्रभावित झाले आहेत. जिओ न्यूजनुसार, 950,000 घरे उद्ध्वस्त झाली आहेत, त्यापैकी 650,000 घरे अर्धी उद्ध्वस्त झाली आहेत.
पाकिस्तानला धक्का
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. दोन्ही संघांना कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकायचा आहे. मात्र, या सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. इतकंच नाही तर पाठीच्या दुखापतीमुळे मोहम्मद वसीम ज्युनिअरलाही बाहेर काढण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी हसन अलीचा संघात समावेश करण्यात आला आहे. हसनला यापूर्वी संघात स्थान मिळाले नव्हते, मात्र शाहीनच्या दुखापतीनंतर त्याला बोलावण्यात आले आहे.