IND vs PAK : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानचं घातलं श्राद्ध, टीम इंडियाची विजयी घटस्थापना
India vs Pakistan ICC World Cup 2023 : वर्ल्ड कप भारतीय संघाने पाकिस्तान संघाचा 7 विकेट्सने पराभव केला आहे. या विजयासह भारताने पाकिस्तान संघाने वर्ल्ड कपमध्ये आठव्यांदा पराभवाची धूळ चारली आहे. या विजयासह भारतीय संंघाने गुणतालिकेमध्ये नंबर वन स्थानाकडे भरारी घेतली आहे.
अहमदाबाद | वर्ल्ड कप 2023 मधील भारत आणि पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यामध्ये भारतीय संघाने 7 विकेटने विजय मिळवला आहे. पाकिस्तान संघाच्या 192 धावांचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माच्या तुफानी अर्धशतकाच्या जोरावर भारताने वर्ल्ड कपमधील विजयाची हॅट्रीक पूर्ण केलीये. वर्ल्ड कपमध्ये भारत पाकिस्तानविरूद्ध अजिंक्य राहिला असून पुन्हा एकदा वर्ल्ड कपमध्ये चारीमुंड्या चीत करत विजयश्री मिळवला.
पाकिस्तान संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने दमदार विजय मिळवला आहे. सलामीवीर शुबमन गिल फार काही चमक दाखवू शकला नाही. शाहिन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर २६ धावांवर तो बाद झाला. तर रोहित शर्मा याने आपलं गणित फिक्स केल्याचं दिसत होतं. हिटमॅनने आज शतक हुकलं याची खंत सर्व चाहत्यांच्या मनात राहिल. रोहितने 63 बॉलमध्ये 86 धावा केल्या यामध्ये 6 चौकार आणि 6 षटकार मारले.
विराट कोहलीने झकास सुरूवात केली होती, मात्र त्याला फार काळ मैदानावर थांबता आलं नाही. विराटने 18 बॉलमध्ये 16 धावा केल्या. रोहित शर्मा याने विजयाचा पाया रचल्यावर के.एल. राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी विजयी भागीदारी केली. श्रेयसनेही आपलं अर्धशतक पूर्ण करत विजयी चौकार मारत विजयावर शिक्कामोर्तब केलं.
पाकिस्तान संघाने भारताच्या गोलंदाजीसमोर गुडघे टेकल्याचं पाहायला मिळालं. इतर सामन्यांमध्ये 250 पेक्षा अधिक धावा दोन्ही संघ सहज करत होते. मात्र पाकिस्तानचा संघ अवघ्या 191 धावांवर गुंडाळला. हाय-व्होल्टेज सामन्यामध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम 50 आणि मोहम्मद रिझवान 49 यांच्या धावा सोडल्या तर इतर कोणालाही मोठी खेळी करता आली नाही. भारताच्या पाचही फलंदाजांनी प्रत्येकी-दोन दोन विकेट्स घेतल्या.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (C), मोहम्मद रिझवान (W), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ
रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज