IND vs PAK Rain | भारत-पाक सामना पावसामुळे रद्द झाल्यास कोण ठरणार विजेता?
India vs Pakistan Icc World Cup 2023 | टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला पाहण्यासाठी क्रिकेट विश्व सज्ज आहे. मात्र हा सामना पावसामुळे रद्द झाला तर कोणती टीम विजेता ठरेल? नियम जाणून घ्या.
अहमदाबाद | रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडिया आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 11 वा सामना खेळण्यास तयार आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबादमध्ये होणार आहे. टीम इंडियासमोर पाकिस्तानचं कडवं आव्हान असणार आहे. कारण टीम इंडियाप्रमाणे पाकिस्तान टीमनेही सलग 2 सामने जिंकले आहेत. टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचा पराभव केला आहे. तर पाकिस्तानने नेदरलँड्स आणि श्रीलंका टीमवर विजय मिळवला आहे. त्यामुळे सामना हा बरोबरीचा होणार, यात काही शंका नाही. मात्र हवामान खात्याच्या अंदाजानुसार या सामन्यात पाऊस हजेरी लावणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे.
हवामान खात्याने या सामन्यादरम्यान पाऊस होणार असल्याचं सांगितलंय. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला, तर सामन्यात व्यत्यय येणार हे निश्चित. याआधीच टीम इंडियाचे वर्ल्ड कपआधीचे 2 सराव सामने हे पावसामुळे रद्द झालेत. तसेच त्याआधी टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यातील आशिया कप 2023 मधील सामनाही पावसामुळे राखीव दिवशी पार पडला आणि निकाली निघाला. त्यामुळे वर्ल्ड कपमधील या हायव्होल्टेज सामन्यात पावसाने एन्ट्री घेतली आणि मॅच रद्द करण्याचा निर्णय झाल्यास विजेता कोण, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना आहे.
सामना रद्द झाल्यास विजेता कोण?
टीम इंडिया-पाकिस्तान या सामन्यासाठी राखीव दिवस नाही. त्यामुळे सामन्याचा निकाल हा मुख्य दिवशीच लागेल. मात्र पावसामुळे मुख्य दिवशी खेळच होऊ शकला नाही, किंवा सामना रद्द झाला तर विजेता कोण होणार? हे जाणून घेऊयात. सामना रद्द झाल्यास कोणीही विजेता होणार नाही. तर दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 पॉइंट वाटून दिला जाईल. मात्र क्रिकेट चाहत्यांना या सामन्याचा थरार हवा आहे. त्यामुळे सामन्यात पाऊस होऊ नये, अशीच प्रत्येक चाहत्याची इच्छा आहे.
वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.
पाकिस्तान क्रिकेट टीम | बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान, फखर जमान, इमाम उल हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हरिस रौफ, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद वसीम.