IND vs SA Test | टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये केप टाऊन येथे दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या कसोटी सामन्याचा निकाल आज दुसऱ्या दिवशीच लागू शकतो अशी स्थिती आहे. कारण काल पहिल्याच दिवशी 23 विकेट गेले. केट टाऊनची विकेट गोलंदाजांना अनुकूल आहे. त्यामुळे इथे गोलंदाज वर्चस्व गाजवतायत. काल टीम इंडियाने दमदार सुरुवात केली होती. त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या 55 धावात गुंडाळला. पहिल्या कसोटीतील पराभवाचा वचपा काढण्याच्या इराद्याने टीम इंडिया खेळतेय असं अनेकांना वाटलं. मोहम्मद सिराजने आपल्या वेगवान गोलंदाजीची दहशत दाखवून दिली. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या 6 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याला जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमारने चांगली साथ दिली. दोघांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट काढल्या. टीम इंडियाची ही कामगिरी पाहून केप टाऊन कसोटीवर वर्चस्व गाजवणार असं दिसत होतं.
पण हा अंदाज फोल ठरला. टीम इंडियाने रबाडा-एन्गिडीच्या वेगवान गोलंदाजीसमोर गुडघे टेकले. टीम इंडियाचा डाव 153 धावात आटोपला. टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेवर फक्त 98 धावांची आघाडी मिळाली. खरतर टीम इंडियाकडे मोठी आघाडी घेण्याची संधी होती. पण भारतीय फलंदाजांनी हाराकिरी केली. एका टप्प्यावर टीम इंडियाच्या 4 बाद 153 धावा होत्या. पण त्यानंतर शुन्यावर टीम इंडियाने 6 विकेट गमावले. परिणामी 153 धावात टीम ऑलआऊट झाली. टीम इंडियाच्या नावावर एका नकोशा रेकॉर्डची नोंद झाली.
दक्षिण आफ्रिकेला मॅचमध्ये आणण्यात त्याचही योगदान
केएल राहुल बाद झाल्यानंतर टीम इंडियाचा डाव गडगडला. रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि विराट कोहली हे एकामागोमाग एक तंबूत परतले. भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांच्यामते टीम इंडियाचा डाव गडगडण्याला केएल राहुल कारणीभूत आहे. त्यांच्यामते केएल राहुल फक्त बाद झाला नाही, तर तो खूप बचावात्मक होऊन खेळला. केएल राहुलने 33 चेंडूत 8 धावा केल्या, यात एक चौकार होता. “तुम्ही फटके मारले पाहिजेत. केएल राहुल खूपच बचावात्मक होऊन खेळत होता. तुम्ही इतके बचावात्मक झालात, तर तुम्ही खेळपट्टीवर टिकू शकत नाही. दक्षिण आफ्रिका मॅचमध्ये परतली, त्यामध्ये केएल राहुलचही छोटस योगदान आहे” असं संजय मांजरेकर ESPNCricinfo वर म्हणाले.
किती टार्गेट असेल तर टीम इंडिया जिंकू शकते?
सध्या दक्षिण आफ्रिकेच्या 3 बाद 62 धावा झाल्या आहेत. अजून ते 36 धावांनी पिछाडीवर आहेत. 125 धावांच्या आसपास टार्गेट असेल, तर टीम इंडिया मॅच जिंकेल असं मांजरेकरांच मत आहे.