IND vs SA : दुसऱ्या कसोटीतील विजयानंतर बुमराहने मोकळं केलं मन, सांगितलं नाणेफेकीनंतरचं गुपित
भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका कसोटी मालिका अखेर 1-1 ने बरोबरीत सुटली आहे. पहिला कसोटी सामना गमवल्यानंतर टीम इंडियावर मालिकेत कमबॅकचं दडपण होतं. पण दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी केली. खासकरून गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत टीम इंडियाचं कमबॅक केलं. विजयानंतर जसप्रीत बुमराहने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.
मुंबई : केपटाऊनमधील दुसरा कसोटी सामना भारताने 7 गडी राखून जिंकला. विजयासह मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवण्यात टीम इंडियाला यश आलं आहे. वेगवान गोलंदाज या सामन्यात विजयाचे शिल्पकार ठरले. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी आपल्या भेदक गोलंदाजीने दक्षिण अफ्रिकन संघाला बॅकफूटवर ढकललं. 1993 पासून टीम इंडिया दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर जात आहे. मात्र या भूमीत मालिका विजयाचं स्वप्न अधुरच राहिलं आहे. धोनीच्या नेतृत्वात 2010-2011 मध्ये मालिका बरोबरीत सोडवली होती. आता 13 वर्षानंतर रोहित शर्माच्या नेतृत्त्वात तशीच कामगिरी करण्यात यश आलं आहे. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडियाने दक्षिण अफ्रिकेला 55 धावांवर रोखलं होतं. त्या बदल्यात भारताने 153 धावा करत 98 धावांची आघाडी घेतली. तर दुसऱ्या डावात दक्षिण अफ्रिकेने 176 धावा केल्या आणि टीम इंडियासमोरो विजयासाठी 79 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान टीम इंडियाने 3 गडी गमवून पूर्ण केलं.
पहिल्या डावात मोहम्मद सिराजने 6 गडी बाद केले होते. तर जसप्रीत बुमराहला दोन गडी बाद करण्यात यश आलं होतं. दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीला धार चढली. जसप्रीत बुमराहने 6 गडी बाद केले. तर सिराजला फक्त एक गडी बाद करता आला. असं असलं तरी या दोघांनी विजयात खऱ्या अर्थाने मोलाची साथ दिली. दुसऱ्या सामन्यातील विजयानंतर जसप्रीत बुमराहने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. सामन्यानंतर विचारलेल्या प्रश्नांना मोकळेपणाने उत्तरं दिली.
काय म्हणाला जसप्रीत बुमराह?
“या मैदानाचं स्थान माझ्या हृदयाच्या खूपच जवळ आहे. येथूनच 2018 साली माझा प्रवास सुरु झाला होता. आमच्याकडे अनुभवी गोलंदाज होते आणि प्रभाव टाकणं खूप गरजेचं होतं. भारतात फिरकीपटू जास्त काम करतात.पण आमचा संघ आता संक्रमणातून जात आहे. गोलंदाजीत आता बराच बदल झाला आहे. खरं तर स्पष्ट संदेश आहे की, लढत राहा. मागच्या सामन्यातही तसाच लढा दिला. संयम खूप महत्त्वाचा आहे. या सामन्यात त्याची अमलबजावणी झाली याचा आनंद होतो. सामना इतक्या वेगाने संपेल याची कल्पना नव्हती. आम्हाला या मैदानावर पहिली फलंदाजीच करायची होती. कसोटी क्रिकेट तुम्हाला आश्चर्याचे धक्के देते. खरंच चांगली मालिका झाली. “, असं वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने सांगितलं.
भारताने दुसऱ्या कसोटीत नाणेफेकीचा कौल गमावला होता. दक्षिण अफ्रिकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण दक्षिण अफ्रिकेच्या धडाधड विकेट गेल्या. त्याचा टीम इंडियाला फायदा झाला. जर ही स्थिती उलट असती तर सामना जिंकणं कठीण झालं असतं. त्यामुळे जसप्रीत बुमराहने शेवटी कसोटी क्रिकेट आश्चर्याचे धक्के देते हे सांगितलं. कर्णधार रोहित शर्माने देखील नाणेफेक गमवल्यानंतर हीच बाब सांगितली होती. आम्हाला पहिल्यांदा फलंदाजी करायची होती असं त्याने नाणेफेकीनंतर सांगितलं होतं.