WTC 2025: दक्षिण अफ्रिकेला पराभूत करताच टीम इंडियाला जबरदस्त फायदा, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा मार्ग सुकर
भारताने दक्षिण अफ्रिकेतील दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवली आहे. दुसऱ्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. दक्षिण अफ्रिकेला पराभवाचा फटका बसला आहे. तर टीम इंडियाला फायदा झाला आहे.
मुंबई : दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा दुसरा कसोटी सामना भारताने जिंकला. कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच सामन्याचा निकाल लागला. केपटाऊनच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणं किती कठीण होतं हे यावरून दिसून येतं. दक्षिण अफ्रिकेने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण टीम इंडियाच्या गोलंदाजांनी खेळपट्टीचा फायदा घेत दक्षिण अफ्रिकेचा संपूर्ण संघ 55 धावांवर तंबूत पाठवला. त्यानंतर या धावांचा पाठलाग करताना टीम इंडिया 153 धावांवर सर्वबाद झाली. भारताच्या 153 धावा असताना 6 गडी बाद झाले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वात खराब कामगिरी होती. विशेष म्हणजे पहिल्या दिवशी एकूण 23 विकेट पडले. दुसऱ्या दिवशी भारताची 98 धावांची आघाडी मोडत दक्षिण अफ्रिकेने 176 धावा केल्या आणि विजयासाठी 79 धावांचं आव्हान दिलं. दुसऱ्या डावात भारताने चांगली खेळी केली. पहिल्या डावात शून्यावर बाद झालेल्या यशस्वी जयस्वालने 28 धावा केल्या. मात्र तिथपर्यंत विजय सोपा झाला होता.
दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण अफ्रिकेला पराभूत केल्याने टीम इंडियाला फायदा झाला आहे. मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवल्याने विजयी टक्केवारीत फायदा झाला आहे. भारताची विजयी टक्केवारी 54.16 टक्के झाली आहे. त्यामुळे पहिल्या स्थानी विराजमान झाली आहे. दक्षिण अफ्रिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश 50 टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यानंतर पाकिस्तान, वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि श्रीलंकेचा क्रमांक लागतो. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिपच्या साखळीतील एका कठीण दौऱ्यापैकी एक होता. ही मालिका जर भारताने 2-0 ने गमावली असती तर अंतिम फेरीचं गणित काही अंशी फिस्कटलं असतं. तर दक्षिण अफ्रिकेनं पहिलं स्थान गमावलं आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि बांगलादेशला फायदा झाला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका याच महिन्याच्या अखेरीस सुरु होणार आहे. या मालिकेत भारताने इंग्लंडला 5-0 पराभूत केलं तर अंतिम फेरीतील स्थान जवळपास निश्चित होईल. इतर संघांच्या कामगिरीवरही तितकंच लक्ष असणार आहे. दक्षिण अफ्रिकेने न्यूझीलंड दौऱ्यात नवाकोरा संघ पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे न्यूझीलंडमध्ये कसोटी जिंकण्याचं मोठं आव्हान दक्षिण अफ्रिकेसमोर असणार आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्कराम, टोनी डी जॉर्जी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को यानसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी