मुंबई | ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी 20 मालिकेनंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात दक्षिण आफ्रिके विरुद्ध टी 20, वनडे आणि कसोटी मालिका खेळणार आहे. साऊथ आफ्रिका टूरची सुरुवात ही टी 20 मालिकेने होणार आहे. एकूण 3 सामन्यांची ही सीरिज असणार आहे. त्यानंतर 3 मॅचची वनडे सीरिज होईल. तर 2 कसोटी सामन्यांनी दौऱ्याची सांगता होईल. अशा या भरगच्च दौऱ्यासाठी टीम इंडियाची आज 30 नोव्हेंबर रोजी घोषणा होणार आहे. या दौऱ्यातील तिन्ही मालिकांसाठी कुणाला संधी मिळणार आणि कुणाला डच्चू याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.
इंडियन एक्सप्रेसनुसार, तिन्ही मालिकांसाठी टीम इंडियाची आज घोषणा होणार आहे. विराट कोहली याने आपण टी 20 आणि वनडे सीरिज खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे विराट या दोन्ही मालिकांमध्ये नसणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे विराट हा थेट कसोटी मालिकेत खेळताना दिसणार आहे.
टीम इंडियाच्या 2 कसोटी सामन्यांचं आयोजन हे सेंचुरियन आणि केपटाऊनमध्ये होणार आहे. निवड समिती कसोटी मालिकेसाठी तगडी टीम निवडण्याच्या प्रयत्नात असणार आहे. कारण ही कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 चा भाग आहे. टीम इंडियाला आतापर्यंत एकदाही दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकता आलेली नाही.
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर रोहितने कर्णधारपदापासून अंतर ठेवलंय ते आतापर्यंत कायम आहे. त्यात आता टीम इंडिया वनडे वर्ल्ड कप फायनलमध्ये पराभूत झालीय. त्यामुळे कॅप्टन रोहित शर्मा त्या दु:खातून सावरलेला नाही. मात्र आगामी टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या पार्श्वभूमीवर रोहितने कॅप्टन्सी करावी, यासाठी त्याची मनधरणी केल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी रोहितचं कॅप्टन्सीसह कमबॅक करणार का, याकडे लक्ष लागून आहे.
उभयसंघात 10 ते 14 डिसेंबर दरम्यान टी 20 मालिका पार पडेल. त्यानंतर 17 ते 21 डिसेंबर दरम्यान एकदिवसीय मालिकेचं आयोजन करण्यात आलं आहे. तर 26 डिसेंबर ते 7 जानेवारी दरम्यान कसोटी मालिका पार पडेल.