IND vs SA : केपटाऊनमध्ये महाराज येताच झाला राम नामाचा गजर! विराट कोहलीने उचललं धनुष्य
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दुसरा कसोटी सामना केपटाऊनमध्ये सुरु आहे. झटपट विकेट बाद होताना पाहूनच खेळपट्टीचा अंदाज येतो. दक्षिण अफ्रिकेचा संपूर्ण संघ 55 धावांवर बाद झाला. एका पाठोपाठ एक गडी बाद होते आणि फलंदाजीसाठी केशव महाराजला उतरावं लागलं आणि तेव्हाच श्री रामाचा गजर झाला. मग काय विराट कोहलीनेही धनुष्य उचललं.
मुंबई : भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकत दक्षिण अफ्रिकेने 1-0 ने आघाडी घेतली आहे. तर दुसरा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी टीम इंडियाची धडपड सुरु आहे. तसं पाहिलं तर पहिला दिवस भारताचा राहिला. भारतीय गोलंदाजांनी दक्षिण अफ्रिकेची पिसं काढली. खासकरून मोहम्मद सिराजने आपल्या भेदक गोलंदाजीने दक्षिण अफ्रिकेला बॅकफूटवर ढकललं. मोहम्मद सिराजने 15 धावा देत 6 गडी बाद केले. तर बुमराह आणि मुकेश कुमारने प्रत्येकी एक गडी बाद केला. चौथ्या षटकांपासून गडी बाद होण्यास सुरुवात झाली आणि 24 षटकापर्यंत संपूर्ण दक्षिण अफ्रिका संघ तंबूत होता. एडन मार्करमला सिराजने पहिल्यांदा तंबूत पाठवलं. तेव्हा संघाची धावसंख्या 5 होती. कागिसो रबाडा ही शेवटची विकेट होती तेव्हा संघाच्या धावा फक्त 55 होत्या. भारताने ही धावसंख्या गाठत लीड घेतला आहे. पण या सामन्यात एक क्षण असा आला की जय श्री रामचा गजर झाला आणि विराट कोहलीला आपल्या भावना आवरता आल्या नाहीत.
पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रातच दक्षिण अफ्रिकेची अशी स्थिती होईल कोणाला वाटलं नव्हतं. एक एक फलंदाज खेळपट्टीवर हजेरी लावून येत होते. त्यामुळे आठव्या स्थानावर फलंदाजीसाठी केशव महाराजला मैदानात उतरावं लागलं. तेव्हा संघाची धावसंख्या 7 बाद 45 इतकी होती. 16 वं षटक सुरु होतं आणि केशव महाराज स्ट्राईकला होता. तेव्हा स्टेडियममध्ये राम सिया राम गाणं वाजलं. क्षेत्ररक्षण करणाऱ्या विराटला आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. गाणं वाजताच विराट कोहलीने धनुष्य उचललं आणि बाण मारण्याची एक्टिंग केली. त्यानंतर हात जोडून नमस्कार केला.
दक्षिण अफ्रिकेकडून खेळणारा केशव महाराज हा हिंदू आहे. भारत दौऱ्यावर आला की तो आवर्जून मंदिरात जातो. यापूर्वी केएल राहुलने विकेटकीपिंग करताना केशव महाराजला याबाबत विचारलं होतं. तू आला की हे गाणं वाजतं असं केएल राहुलने विचारलं तेव्हा केशव महाराजने त्याला सहमती दर्शवली होती.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा, मुकेश कुमार
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्कराम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी