IND vs SL 1st Test: सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला ऋषभ पंत (Rishabh Pant) आज कमनशिबी ठरला. त्याचं शतक अवघ्या चार धावांनी हुकलं. 96 धावांवर खेळताना लकमलच्या (Lakmal) एका सुंदर चेंडूवर पंत क्लीन बोल्ड झाला. स्वत: ऋषभला सुद्धा बाद झाल्यानंतर निराशा लपवता आली नाही. अशी चूक कशी झाली? असेच भाव त्याच्या चेहऱ्यावर होते. ऋषभ आऊट झाला, त्यावेळी चेंडू बदलण्यात आला होता. त्या नव्या चेंडूचा लंकेचा वेगवान गोलंदाज लकमलला फायदा झाला. ऋषभने आज मैदानावर आल्यापासून वनडे स्टाइल फलंदाजी केली. त्याने 97 चेंडूत 96 धावा केल्या. यात नऊ चौकार आणि चार षटकार होते. ऋषभने श्रीलंकेच्या (India vs Srilanka) गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.
त्याने चौफेर फटेकबाजी करताना श्रीलंकेच्या गोलंदाजांना चांगलच धोपटलं. ऋषभने रवींद्र जाडेजासोबत सहाव्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी केली. ऋषभने जाडेजासोबत फलंदाजी करताना वेगाने धावा जमवल्या. त्यामुळे भारताने 300 धावांचा टप्पा ओलांडला. श्रीलंकेने भले भारताच्या सहाविकेट काढल्या असतील, पण भारतीय फलंदाजचं श्रीलंकेवर जास्त वरचढ दिसले.
Rishabh Pant walks back after a brilliant knock of 96 off 97 deliveries.
Live – https://t.co/c2vTOXAx1p #INDvSL @Paytm pic.twitter.com/br0O7nDaIN
— BCCI (@BCCI) March 4, 2022
ऋषभची फलंदाजी पाहून तो सहज शतक झळकावणार असंच सर्वांना वाटत होतं. पण तितक्यात लकमलच्या एका चेंडूने घात केला. खरंतर शतकाची अपेक्षा 100 वा कसोटी सामना खेळणाऱ्या विराट कोहलीकडून होती. पण विराट 45 धावांवर आऊट झाला. त्याच्यानंतर फलंदाजीला आलेल्या ऋषभने आपल्या फलंदाजीने शतकाची आस निर्माण केली होती. पण ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.