टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड, वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय
आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात जे कोणत्याच टीमला जमलं नाही, ते टीम इंडियाने करुन दाखवलंय. टीम इंडिया वनडे क्रिकेट इतिहासात 317 धावांनी विजयी ठरली आहे.
तिरुवअनंतपूरम : टीम इंडियाने नववर्षाची एकदम शानदार सुरुवात केली आहे. टीम इंडियाने रविवारी 15 जानेवारीला श्रीलंकेचा तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तब्बल 317 धावांनी मोठ्ठा विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने 3-0 च्या फरकाने श्रीलंकेला क्लिन स्वीप केला. टीम इंडियाने या विजयासह मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केलाय. आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात जे कोणत्याच टीमला जमलं नाही, ते टीम इंडियाने करुन दाखवलंय.
टीम इंडियाने वनडे क्रिकेटच्या इतिहासात 317 धावांनी विजयी ठरण्याचा बहुमान मिळवला आहे. आतापर्यंत वनडे क्रिकेटमधील मोठ्या विजयाचा रेकॉर्ड हा न्यूझीलंडच्या नावावर होता. न्यूझीलंडने आयर्लंडवर 290 धावांनी विजय मिळवला होता. तर ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानला 275 धावांनी पराभूत केलं होतं. मात्र या संघांनी इतक्या मोठ्या फरकाने जिंकण्यासाठी 400 पेक्षा अधिक धावांचं आव्हान हे प्रतिस्पर्धी संघांना दिलं होतं. मात्र टीम इंडियाने श्रीलंकेसमोर 391 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं.
एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात टीम इंडियाच एकमेव अशी आहे जिने 300 पेक्षा अधिक धावांच्या अंतराने सामना जिंकला आहे. येत्या काळात हा रेकॉर्ड कदाचित ब्रेक होईल.
सामन्याचा धावता आढावा
टीम इंडियाने टॉस जिंकला. बॅटिंगचा निर्णय घेतला. निर्धारित 50 ओव्हरमध्ये 390 धावा केल्या. टीम इंडियाकडून विराट कोहली याने सर्वाधिक नाबाद 166 धावांची खेळी केली. तर त्या खालोखाल शुबमन गिलने 116 धावांची शतकी खेळी केली. या दोघांशिवाय कॅप्टन रोहित शर्माने 43 धावा जोडल्या. तर श्रेयस अय्यरने 38 धावांचं योगदान दिलं.
भारत दौऱ्याचा शेवट विजयाने करायचा या उद्देशाने श्रीलंका मैदानात उतरली. मात्र विजयासाठी 391 धावांचा डोंगर श्रीलंकेला सर करायचा होता. सामन्यात टीम इंडियाला झुंज द्यायचं राहिलं बाजूला. सामना एकतर्फी झाला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी श्रीलंकेच्या फलंदाजांना मैदानात टिकूही दिलं नाही.
श्रीलंकेचा डाव 73 धावांवर आटोपला. श्रीलंकेच्या 7 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर श्रीलंकेचा शेवटच्या फलंदाज बॅटिंगसाठी आला नाही. टीम इंडियाकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 विकेट्स घेतले. तर कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
विराट सामानावीर आणि मालिकावीर
दरम्यान विराट कोहलीने 166 धावांची खेळी केली. त्यामुळे विराटला मॅन ऑफ द मॅच ठरवण्यात आलं. तसेच विराटने या मालिकेतील पहिल्या सामन्यातही शतक ठोकलं होतं ,अशा प्रकारे विराटने या मालिकेत 2 शतक केले. त्याच्या या कामिगरीसाठी विराटला मालिकावीर घोषित करण्यात आलं.